लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कांद्याच्या भावातील चढउतार रविवारीही कायम राहिली. काही दिवसांपूर्वी घटलेले कांद्याचे भाव रविवारी पुन्हा वाढले आहेत. जुन्या कांद्याला घाऊक बाजारात प्रतिकिलोस ३२ ते ३८ रुपये भाव मिळाला, तर नवीन कांद्याचा भाव ३० ते ३२ रुपयांपर्यंत पोहोचला.मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने सध्या कांद्याचे भाव तेजीत आहेत. मागील पंधरा दिवसांपासून ग्राहकांना कांदा रडवू लागला आहे. काही दिवसांपूर्वी आवक वाढल्याने कांद्याचे भाव काही प्रमाणात कमी झाले होते. मात्र, रविवारी पुन्हा आवक कमी झाल्याने भाव वधारले. रविवारी मार्केट यार्डातील कांदा विभागात जुना आणि नवीन कांदा मिळून सुमारे १०० ट्रक आवक झाली. बाजारात पुणे जिल्ह्यातून जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, मंचर आणि नगर जिल्ह्यातील संगमनेर, श्रीगोंदा येथून जुना कांदा तर पुणे आणि सातारा जिल्ह्यातून काही प्रमाणात नवीन कांद्याची आवकहोत आहे.आवक वाढण्यास महिना लागणारपरतीच्या पावसाने कांद्याला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे बाजारात नवीन कांद्याची आवक अपेक्षेपेक्षा खूप कमी होत आहे. तसेच आवक होत असलेल्या कांद्याचा दर्जाही काही प्रमाणात खराब आहे. त्यामुळे जुन्या कांद्यालाच ग्राहकांची पसंती मिळत आहे. जुन्या कांद्याचे भाव वाढत असल्याने नवीन कांदाही भाव खाऊ लागला आहे. पावसामुळे साठवणूक केलेल्या जुन्या कांद्याचे प्रमाणही कमी झाले आहे. बाजारातील भाव बघून हा कांदा बाहेर काढला जात आहे. त्यामुळे आवक कमी-अधिक होत आहे. व्यापाºयांकडूनही कांद्याची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू आहे. नवीन कांद्याची बाजारातील आवक वाढण्यास जवळपास महिना जावा लागणार आहे. तोपर्यंत हे भाव टिकून राहण्याची शक्यता व्यापाºयांनी व्यक्त केली.
कांदा पुन्हा महागला, मागणीच्या तुलनेत आवक कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 7:13 AM