मढ : जुन्नर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. साठवणूक केलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडत असल्याने तो फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. निकृष्ट प्रतीचे बियाणे, अवकाळी पाऊस, विचित्र हवामान या सर्वांचा फटका बसला आहे. या वर्षी बियाणात झालेली फसवणूक, डेंगळ्या कांद्याचे वाढलेले प्रमाण तसेच अवकाळी पावसाचा फटका यामुळे उत्पादनात मोठी घट झाली. यावरही मात करत शेतकऱ्याने कांद्याची प्रतवारी करून कांदे बराकीत साठवले. परंतु, दिवाळीपर्यंत टिकणारे कांदे सध्या बराकीतच सडू लागले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. . मंचर : कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली आहे. मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी झालेल्या लिलावात कांद्याला १० किलोस २८० रुपये असा बाजारभाव मिळाला. रविवारी झालेल्या लिलावात कांद्याला १० किलोस २३५ रुपये बाजारभाव मिळाला होता. कांद्याची आवक कमी होऊ लागली आहे. बराकीत साठवलेला कांदा विक्रीसाठी येतो. मंगळवारी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक कमीच होती. ३५०० पिशवी कांदा विक्रीसाठी आला. दुपारी लिलावाला सुरुवात होताच कांद्याचे बाजारभाव वाढले गेले. १० किलोस १६० ते २८० रुपये बाजारभाव मिळाला आहे. चांगल्या मालास २८० रुपये असा बाजारभाव मिळत असून, शेतकरी अजून बाजारभाव वाढण्याची वाट पाहत आहेत. काही शेतकऱ्यांनी बराखीतील कांदा राखून ठेवला असून बाजारभाव वाढण्याची वाट पाहत आहे. (वार्ताहर)
कांदा सडतोय, भाव वाढतोय
By admin | Published: July 22, 2015 3:21 AM