गेल्या चार - पाच दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल घडून आला आहे. बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले असून दूषित हवामानामुळे रब्बी हंगामातील मागास कांदा, गहू, मका, कोबी, फ्लॉवर, फुलझाडे, पालेभाज्या, फळपिके तसेच महत्वाच्या तोडीव पिकांवर विशेषतः मिरची, गवार, वांगी, वालवर पिकांवर मावा व करपा रोगराईचे सावट पसरले आहे.
चालू वर्षी खरीप व रब्बी या दोन्हीही प्रमुख हंगामात शेतकऱ्यांना दुषित हवामानाशी सामना करावा लागला आहे. रब्बी हंगामातील सुरुवातीच्या आगाप कांदा पिकाला अगदी लागवडीपासूनच रासायनिक औषधांची फवारणी करावी लागत आहे.
रब्बीतील मागास कांद्याची वाढ खुंटून पिकांवर करपा, मावा व पीळ रोगांचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे. आगाप कांदालागवडीला ज्या लहरी हवामानाने बाधित केले होते. त्याचप्रकारे मागास कांद्याच्याही संवर्धनासाठी महागडी रासायनिक औषधांची फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढवली आहे.
खेडच्या पूर्व तसेच शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात मुबलक पाणी ही शेतकऱ्यांसाठी जमेची बाजू ठरत आलेली आहे. चालू वर्षी कांदा रोपांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. तरीही शेतकऱ्यांनी महागडी रोपे खरेदी करून लागवडी केल्या आहेत. मात्र हवामानाची साथ मिळत नसल्याने कांदालागवडी धोक्यात येऊ लागल्या आहेत.
दूषित हवामानामुळे मका, मागास गहू, फुलझाडे, पालेभाज्या, फळपिके, कोबी, फ्लोवर, आदी महत्वाच्या सर्वच पिकांवर करपा, मावा, पीळ, चिकटा, अळी आदी रोगांचा अधिक प्रादुर्भाव होऊ लागला आहे. पुढील काही दिवस वातावरण असेच राहिल्यास ही पिके पूर्णत्वास येण्यास अडचण येणार असल्याचे उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.
रब्बी हंगामात हवामान बदलाचा प्रभाव आणि परिणाम जाणवत आहे. गहू आणि कांदा पिकाला पाणी, खते आणि औषधांचे योग्य नियोजन केल्यास पीक यशस्वीपणे काढता येईल. तुरा आलेले ऊस पीक गळपाला येणे योग्य राहिल.
- डॉ. रामचंद्र साबळे, जेष्ठ हवामानतज्ञ.
ढगाळ वातावरण पिकांच्या वाढीसाठी निश्चितच धोकादायक ठरत आहे. गेल्या दहा - बारा दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल घडून आल्याने पिकांवर रोगराई पसरू लागली आहे. कांद्याच्या उत्पादनात किमान ५०% घट झाली आहे.
- सतीश गावडे, शेतकरी.
११ शेलपिंपळगाव
ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर रासायनिक औषधांची फवारणी करताना शेतकरी मग्न आहे.
(छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)