पुणे : समाजा-समाजातील तणाव आणि हिंसेच्या वातावरणात रात्रीच्या वेळी दोन व्यक्तींची एका निर्मनुष्य ठिकाणी भेट होते. या दोघांच्याही मनात असलेल्या एकमेकांबद्द्लच्या प्रतिमा आणि त्यातून घडणारे नाट्य या विषयाभोवती गुंफलेल्या ‘डोगमा’ या लघुचित्रपटाची लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ‘एशियन फिल्म फेस्टिवल’साठी निवड झाली आहे. येत्या गुरुवार दि. १२ डिसेंबर रोजी हा लघुचित्रपट दाखवला जाणार आहे. या लघुचित्रपटाची गेल्या ३ महिन्यांत १८ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसाठी निवड झाली असून मानाच्या समजल्या जाणाऱ्या तीन महोत्सवात त्याला पारितोषिके मिळाली आहेत.या लघुपटाचे लेखन आणि दिग्दर्शन ओंकार मोदगी यांनीच केले असून, ओंकार भस्मे आणि यशपाल सारनाथ यांनी त्यात भूमिका साकारल्या आहेत. लॉस एंजेलिसमधील निवडीबरोबरच जानेवारी २०२० मध्ये होणाºया बाराव्या जयपूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठीही हा लघुचित्रपट निवडला गेला आहे. या महोत्सवासाठी ९५ देशांमधून २१६१ चित्रपट, लघुचित्रपट व माहितीपट आले होते. यातून ५० तज्ज्ञ ज्यूरींनी २१९ चित्रपटांची निवड केली आहे. त्यात डोगमाने स्थान मिळवले आहे. ओंकार यांनी युनायटेड किंग्डममधील युनिव्हर्सिटी आॅफ इस्ट आँग्लियामधून ‘क्रिएटिव्ह रायटिंग’मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून, त्यांना ‘इंटरनॅशनल एक्सलन्स शिष्यवृत्ती’नेही सन्मानित करण्यात आले आहे.या विषयी सांगताना ओंकार मोदगी म्हणाले, यापूर्वी या लघुपटास कोलकत्ता येथे झालेल्या ‘मूडी क्रॅब फिल्म फेस्ट २०१९’ मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ‘आॅडियन्स चॉईस अॅवॉर्ड’, पुण्यातील ‘ग्रेट मेसेज इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ आणि ’नेक्सजेन इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ज्यूरी पुरस्कार मिळाला आहे. केरळमधील त्रिसूर येथे होणाºया ‘साईन्स’ या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाºया चित्रपट महोत्सवात हा लघुचित्रपट ‘फोकस सेक्शन’मध्ये निवडला गेला होता. अमेरिकेत नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या ‘द शॉर्ट फिल्म अॅवॉर्डस’मध्ये ‘आऊटस्टँडिंग टेक्निकल वर्क’ या विभागात ‘डोगमा’ हा एकमेव भारतीय चित्रपट १००० चित्रपटांमधून अंतिम ५ चित्रपटांमध्ये निवडला गेला होता.‘डोगमा’ या लघुचित्रपटाने मला लेखक आणि दिग्दर्शक म्हणून अधिक समृद्ध केले. या चित्रपटास महोत्सवांमध्ये मिळणारा प्रतिसाद वाखाणण्याजोगा असून, लॉस एंजेलिसमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी अभिमानाचे आहे. -ओंकार मोदगी---------------------------
ओंकार मोदगी यांच्या ‘डोगमा’ लघुपटाची ‘एशियन फिल्म फेस्टिवलसाठी निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 7:32 PM
या लघुचित्रपटाची गेल्या ३ महिन्यांत १८ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसाठी निवड
ठळक मुद्देया महोत्सवासाठी आले ९५ देशांमधून २१६१ चित्रपट, लघुचित्रपट व माहितीपट