लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : बारावीचा निकाल जाहीर होताच शहरातील प्रमुख महाविद्यालयांच्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. काही महाविद्यालयांनी मात्र विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा आॅनलाइन निकाल मंगळवारी जाहीर झाला. विद्यार्थ्यांना आता वरिष्ठ महाविद्यालयातील प्रवेशाचे वेध लागले आहेत. विद्यार्थ्यांना मंगळवारी त्यांना पडलेल्या गुणांची टक्केवारी आॅनलाइन समजली असली तरी प्रत्यक्ष गुणपत्रिका ९ जून रोजी मिळणार आहेत. दरम्यानच्या काळात त्यांना प्रवेश हव्या असलेल्या महाविद्यालयांचे आॅनलाइन अर्ज भरून ठेवता येणार आहेत. फर्ग्युसन महाविद्यालयातील विज्ञान व कला शाखेच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी बुधवारपासून आॅनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्यानंतर त्यांना आॅनलाइन अर्जाची प्रिंटआऊट काढून त्याला गुणपत्रिका व आवश्यक कागदपत्रे जोडून ती कागदपत्रे महाविद्यालयात जमा करावी लागणार आहेत. बीएमसीसी महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रियाही याच पद्धतीने पार पडणार आहे. प्रवेशाची अधिक माहिती फर्ग्युसन व बीएमसीसी महाविद्यालयांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.संकेतस्थळावर अर्ज1स.प. महाविद्यालयाच्या वरिष्ठ महाविद्यालयातील प्रथम वर्ष प्रवेशाची आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया ५ जूनपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्यानंतर ९ जून रोजी प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती संकेतस्थळावर जाहीर केली जाईल, अशी माहिती स.प. महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप सेठ यांनी दिली.2गरवारे महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्यानंतर ९ जूननंतरच सुरू केली जाणार आहे. आॅनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना गुणपत्रिका स्कॅन करून अपलोड करावी लागेल, अशी माहिती गरवारे महाविद्यालयाच्या प्राचार्या मुक्तजा मठकरी यांनी दिली. 3मॉडर्न महाविद्यालयाच्या तिन्ही शाखांच्या प्रथम वर्ष प्रवेशाचे अर्ज संकेतस्थळावर बुधवारपासून आॅनलाइन उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्यानंतर त्यांना आॅनलाइन अर्जात भरलेली गुणांची माहिती व गुणपत्रिका यांची महाविद्यालयातून पडताळणी करून घ्यावी लागणार आहे, अशी माहिती मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र झुंजारराव यांनी दिली.
आॅनलाइन प्रवेश प्रकिया आजपासून
By admin | Published: May 31, 2017 3:08 AM