पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीची परीक्षा येत्या ११ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या परीक्षेसाठी आवश्यक प्रवेशपत्रे ऑनलाइन पद्धतीने शुक्रवारपासून (दि. १०) उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावरून ही प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहेत. मात्र, या प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर प्राचार्यांची सही व शिक्का घेणे आवश्यक आहे.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, यंदाची बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत होणार आहे. पुरवणी परीक्षा लवकर घेऊन त्याचा निकाल लवकर जाहीर करण्याच्या उद्देशाने, दहावी आणि बारावीची परीक्षा यंदा ८ ते १० दिवस आधी घेण्यात येत आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ‘ॲडमिट कार्ड’ या लिंकद्वारे डाउनलोड करता येतील. ज्या आवेदनपत्रांना पेड (paid ) असे स्टेट्स प्राप्त झाले आहे. त्यांचीच प्रवेशपत्रे पेड स्टेटस ॲडमिट कार्ड' या पर्यायाद्वारे उपलब्ध होतील. एखाद्या विद्यार्थ्याचे प्रवेशपत्र गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी पुनश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत (डुप्लिकेट) असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र द्यायचे आहे, असे राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी कळविले आहे.