पुणे : विशेष मुलांच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या ‘अब नॉर्मल होम’ या संस्थेचा नववा वर्धापनदिन ऑनलाइन पद्धतीने साजरा केला. या वेळी ‘शोध-स्व’चा अशी संकल्पना घेऊन मुलांनी कोरोनाकाळात आत्मसात केलेल्या वेगवेगळ्या कौशल्याचे सादरीकरण केले. ज्यामध्ये चित्रकला, पाककला, श्लोकपठण, वाद्यांची जुगलबंदी, गाणं आणि त्यावरील छोटंसं नाटक, नाच, तसेच एकपात्री नाटक अशा बहुविध गोष्टींचा समावेश होता.
प्रसिद्ध जलतरंगवादक मिलिंद तुळणकर यांनी या विशेष मुलांकडून गाणे व वाद्यांची जुगलबंदी बसवून घेतली होती. अब नॉर्मल होम हे विशेष मुलांचे (बौद्धिक अक्षम, अध्ययन अक्षम, सेरेब्रल पाल्सी, स्वमग्न, अतिचंचल, डाऊन सिंड्रोम, गतिमंद) पुनर्वसन केंद्र २०१२ पासून गांधीभवन कोथरूड येथे विनाअनुदानित तत्त्वावर कार्यरत आहे. या वर्षी कोरोनामुळे शाळा बंद असल्याने वर्धापनदिन कसा साजरा करावा हा प्रश्न भेडसावत होता. दरवर्षी वेगवेगळी थीम घेऊन अब नॉर्मल होमची मुलं निरनिराळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना मानवंदना देत असतात. परंतु, या वर्षी पूर्वनियोजित थीम, मुलं संस्थेत येत नसल्याने करता येणार नव्हती. मग कोणती थीम घ्यावी हा विचार सुरू झाला. कोरोनाने सर्व जग थांबलं होतं, पण आमची मुलं मात्र काहीना काही नवीन शिकत होती. म्हणूनच मग ‘शोध-स्व’चा अशी थीम घेतली आणि मुलांनी करोना काळात आत्मसात केलेल्या कौशल्याचे सादरीकरण करणे असे ठरले, अशी माहिती शाळेच्या संचालिका किशोरी पाठक यांनी सांगितली. तसेच संस्थेचे संस्थापक पंकज मिठभाकरे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. मेघना मिठभाकरे यांनी सूत्रसंचालन केले व स्वरदा ताम्हनकर यांनी आभार मानले.