सिंहगड रस्ता : ग्रामपंचायत निवडणुकीच्या आॅनलाईन प्रक्रियेने बुधवारी बहुतांश उमेदवारांना घरचा रस्ता दाखविला. आयोगाने उमेदवारांना उपलब्ध करून दिलेले नामनिर्देशनपत्रांचे संचातील (अर्जाचे) अपुरे दाखले, उमेदवारांनी अर्जासमवेत जोडलेले दाखले परस्पर गहाळ करणे, छाननीची प्रक्रिया पूर्ण करताना उमेदवारांस आपली बाजू मांडू न देता परस्पर निर्णय देणे, अशा एक ना अनेक कारणांनी सार्वत्रिक निवडणुकीच्या छाननीची प्रक्रिया गाजली.हवेलीतील ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची छाननी प्रक्रिया बुधवारी शिवाजीनगर येथील धान्य गोडाऊनमध्ये झाली. निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या नामनिर्देशनपत्राचे संचात मुळातच काही दाखले, घोषणापत्र कमी असल्याचा फटका काही उमेदवारांना बसला. तर काही उमेदवारांनी छाननी प्रक्रियेत आपल्याला बाजू मांडण्याची योग्य संधीही दिली गेली नसल्याच्या तक्रारी केल्या. अर्जासोबत जोडलेले घोषणापत्र गहाळ करून अर्ज बाद केल्याचा गंभीर आरोप घेरा सिंहगड येथील महिला उमेदवाराने केला आहे. तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यासंदर्भात लेखी तक्रार करण्यात आली आहे. आॅनलाईन अर्जाच्या या प्रक्रियेबाबत बहुतांश उमेदवारांनी संताप व्यक्त केला. (वार्ताहर)
आॅनलाईन अर्जाची पद्धत ठरतेय त्रासदायी
By admin | Published: July 24, 2015 3:59 AM