पिंपरी : आरटीई प्रवेश प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्यासाठी पालकांची धावपळ सध्या सुरू आहे; परंतु पोर्टलच्या तांत्रिक अडचणींमुळे पालकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आरटीईचे प्रवेश ८ मेपर्यंत घेता येणार आहेत. मात्र, बुधवार (दि.०३) पर्यंत शहरात फक्त ३७ टक्केच प्रवेश झाले आहेत. त्यामुळे राहिलेले प्रवेश होतील का? याची धाकधूक पालकांमध्ये आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ अन्वये दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येते. त्यानुसार २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया अंतर्गत ऑनलाइन सोडत ५ एप्रिलला निवड झालेल्या पालकांनी १३ ते २५ एप्रिल या कालावधीत प्रवेश निश्चित करावा, असे सांगतिले होते. मात्र, सर्व्हर डाउन असल्यामुळे दिलेल्या मुदतीत बालकांचे प्रवेश निश्चित करता आले नाही. त्यामुळे बालकांचे प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ ८ मेपर्यंत दिली होती.
आतापर्यंत फक्त १२१८ प्रवेश...
शहरातील आकुर्डी व पिंपरी विभागांतर्गत एकूण ३ हजार २८१ जागा आहेत. त्यापैकी मंगळवारी दिवसाअखेर १ हजार २१८ प्रवेश झाले. त्यामुळे चार दिवसांत राहिलेले प्रवेश होणार का ? असा सवाल पालकांमधून उपस्थित होत आहे.
सर्व्हरचा अडथळा...
शहरातील दोन्ही केंद्रांवर कागदपत्रे पडताळणी करून प्रवेश दिले जात आहेत. त्यात सर्व्हरचा अडथळा येत असल्याने वेळ जात आहे. मुदत वाढ मिळेल अशी अपेक्षा आहे. - संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी
आरटीई दृष्टिक्षेपात...
विभाग एकूण जागा झालेले प्रवेश शिल्लक प्रवेश
आकुर्डी २१८५ ७७० १३९८
पिंपरी १०९६ ४४० ६१५