पुणे : आयटी हब अशी ओळख असलेल्या पुण्यात इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे आता वीज बिल भरण्यासाठी पुणेकर रांगा लावत नसून, घरबसल्या ते भरत आहेत. जून महिन्यात पुणे परिमंडळातून तब्बल ६६ कोटी ४३ लाख रुपयांचे बिल इंटरनेटच्या माध्यमातून आॅनलाईन पद्धतीने भरले आहे. गेल्या काही वर्षांत पुण्यात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आॅनलाईन पद्धतीने विविध वस्तू विकत घेण्यापासून आॅनलाईन पद्धतीने बिले भरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. हेच ओळखून महावितरणनेही आपल्या वीज ग्राहकांसाठी आॅनलाईन पद्धतीने बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा सुरू करताच अवघ्या काही महिन्यांतच त्याला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद देण्यास सुरुवात केली.गेल्या जूनमध्ये पुणे परिमंडळातील महावितरणच्या ३ लाख ६१ हजार २४८ वीज ग्राहकांनी कार्यालयात येऊन रांगा न लावता घरबसल्या इंटरनेटद्वारे हे ६६ कोटी ४३ लाख रुपये भरले आहेत. गणेशखिंड मंडळमधील आॅनलाईन पेमेंट करणाऱ्या ग्राहकांची संख्या जूनमध्ये १ लाख ८४ हजारांवर गेली असून, त्यांनी सर्वाधिक ३३ कोटी ४५ लाखांचा वीज बिल भरणा केला आहे. यात सर्वाधिक पिंपरी विभागातील ग्राहक आहेत. तेथील ७२ हजार ८२९ ग्राहकांनी ९ कोटी ९७ लाख रुपयांचा तसेच शिवाजीनगर विभागात ४० हजार ९०५ वीज ग्राहकांनी ९ कोटी ६ लाख रुपयांचा आॅनलाईन भरणा केला आहे. रास्ता पेठ मंडळमधील १ लाख ४९ हजार ८२४ ग्राहकांनी गेल्या महिन्यात २६ कोटी ९९ लाखांचा आॅनलाईन वीज बिल भरणा केला आहे. यात सर्वाधिक ग्राहक हे बंड गार्डन विभागातील आहेत. तेथे सर्वाधिक ६ कोटी २४ लाख तसेच नगररोड विभागात ६ कोटी ५ लाख रुपयांचा आॅनलाईन वीज बिल भरणा झाला आहे. पुणे ग्रामीण मंडळातील २७ हजार १३४ ग्राहकांनी ५ कोटी ९९ लाखांचा आॅनलाईन वीज बिल भरणा केला आहे.
आॅनलाईन वीज बिल भरणा ६६ कोटींवर
By admin | Published: July 23, 2015 4:27 AM