पुणे : बँक खात्याची केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला सव्वा पाच लाख रुपयांचा आॅनलाइन गंडा घातला. ही घटना कोथरूडमधील पौड रस्त्यावर घडली.
याप्रकरणी ६० वर्षीय नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाईलवर बँक खात्याचा केवायसी पेंडिंग असल्याचा मेसेज पाठविला होता. त्यानंतर चोरट्याने त्यांना फोन करून मुंबईतील बांद्रा बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. केवायसी अपडेट केला नाही, तर तुमचे अकाउंट ब्लॉक करण्याची धमकी सायबर चोरट्याने दिली. त्यानुसार ज्येष्ठाने संबंधिताला बँकखात्याची आॅनलाईन माहिती दिली. त्यानंतर सायबर चोरट्याने त्यांना लिंक पाठवून ६ लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक केली. ज्येष्ठाने बँकेसोबत पत्रव्यवहार करून १ लाख १० हजारांची रक्कम परत मिळविली. मात्र, उर्वरित ५ लाख २५ हजारांची फसवणुकीप्रकरणी तक्रार दिली आहे.
-------------------------------