पुणे :पुणे, पिंपरी आणि जिल्ह्यात लाॅटरीच्या नावाखाली ऑनलाइन जुगार अड्डे सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. विशेषत: पुण्यात महापालिका भवन जवळच ऑनलाइन जुगार सुरू हाेता. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने येथील अशा सहा अड्ड्यांवर छापा टाकून ५५ जणांविरोधात गुन्हे दाखल केले. तसेच साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी अब्दुल मेमन, विजय बनकर, राजेंद्र माने, सतीश बोगार, किशोर देवकुळे, बच्चेलाल गौड, श्रावणसिंग नाथावत,संदीप राजपूत, शेळके, रियाज हणुरे, रफिक शेख, बाळासाहेब जेधे, मंगेश शितोळे, किसन तेलोरे, अजय शिवमोरे, राजेश यादव, दीपक ओझा, किशोर नगराळे, विजय भिल्लोड, सुरेश गारडे, राहुल जगधने, बापू भोसले, सुभाष देवरे, गणेश परदेशी, गोपाळ पारेकर, नितीन डोंगरे, महेंद्र बेरी, रामदास खैरे, सलीम शेख, दर्शन साहू, सुशील पवार, धनंजय कानगुडे, राजकुमार सरोज, प्रकाश कंकाळ, राजेंद्र बेल्हेकर, विलास सरजे, प्रवीण नगराळे, सिद्धू गायकवाड, ज्ञानेश्वर भगत, मनोज शहा यांच्यासह एकूण ५५ जणांच्या गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, शिवाजीनगर भागातील महापालिका भवनजवळ लाॅटरीच्या नावाखाली ऑनलाइन जुगार घेण्यात येत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने स्वास्तिक लाॅटरी सेंटर, स्टार लॉटरी सेंटर, सवेरा लॉटरी सेंटर, साई प्रतीक लॉटरी सेंटर, शहा लॉटरी सेंटर, जीपीएस लॉटरी सेंटर या सहा अड्ड्यांची खातरजमा करत या अड्ड्यांवर छापे टाकले. तेथून जुगाराच्या साहित्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला. ऑनलाइन जुगार प्रकारात जुगार अड्डा मालक, चालकांनी गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचून, संगणकावर ऑनलाइन व्यवहार करून शासन महसूल बुडवून राज्य सरकारची फसवणूक केल्याचे पोलीस निरीक्षक पुराणिक यांनी सांगितले.
लाॅटरी शासकीय मान्यतेने चालते. त्यातून शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र ऑनलाइन लाॅटरीच्या नावाखाली शहरात जुगार अड्डे सुरू आहेत. मटका, ऑनलाइन लाॅटरीच्या नावाखाली जुगार खेळण्याकडे कष्टकरी वर्गासह नोकरदार आकर्षित झाले आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात अशा प्रकारचे अड्डे राजरोस सुरू आहेत, त्यावर धडक कारवाई करण्याची गरज आहे.