पुणे : मैलापाणी शुद्धीकरण केंद्रातून शुद्ध केलेले पाणी किती शुद्ध आहे, याची आता ऑनलाईन सिस्टिमव्दारे तपासणी होणार आहे. ही ऑनलाईन यंत्रणा महापालिकेच्यावतीने शहरातील ९ मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांवर कार्यान्वित करण्यात येणार असून, आजपासून ती डॉ. नायडू मैलापाणी शुद्धीकरण केंद्रात कार्यान्वित झाली आहे. या ऑनलाईन तपासणी सुविधेमुळे सेन्सर्सच्या माध्यमातून पाण्याच्या शुद्धतेची माहिती केवळ महापालिकाच नव्हे तर, ती लागलीच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व केेंद्रीय प्रदूषण मंडळाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध होणार आहे. मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांमध्ये प्रक्रिया करून शुद्ध केलेले पाणी जेथे बाहेर नदीत सोडण्यात येते, त्याठिकाणी ही ‘ऑनलाईन कंटीन्यूएस मॉनिटरिंग सिस्टिम’ बसविली आहे़ महापालिकेने दोन वर्षांकरिता ही यंत्रणा भाडेतत्त्वावर घेतली असून, त्यानंतर ती महापालिकेच्या मालकीची होणार आहे.
या यंत्रणतील सेन्सर्सच्या माध्यमातून बाहेर पडणाऱ्या पाण्यातील पीएच, बीओडी, सीओडी, टेम्परेचर (कमी झालेल्या विषारी घटकांची टक्केवारी, ऑक्सिजनचे प्रमाण व त्याची उपयुक्तता) क्षणाक्षणाला मानवी हस्तक्षेपाशिवाय मोजले जाणार आहे. यामुळे प्रदूषण मंडळाने ठरवून दिलेले निकष पूर्ण होत नसतील, तर लागलीच शुद्धीकरण केंद्रातील उणिवा दूर करता येणार आहेत़
-----------------
डॉ. नायडू मैलापाणी शुद्धीकरण केंद्रामध्ये महापालिकेने ‘ऑनलाईन कंटीन्यूएस मॉनिटरिंग सिस्टिम’ बसविली आहे. अशा प्रकारची यंत्रणा बसविणारी पुणे महापालिका ही राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे़
- श्रीनिवास कंदुल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग
-----------------------