लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शासनाच्या ऑनलाइन सरिता प्रणालीवरील भाडेकरार संकेतस्थळावर भाडेकरार नोंदवताना प्रचंड अडचणी येत आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून ही समस्या निर्माण झाली असून आता तर मालक, भाडेकरू आणि साक्षीदारांचे छायाचित्र भाडेकरारासाठी काढता येत नसल्याचेही निदर्शनास आले आहे.
याबाबत शासनाच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला असोसिएशन ऑफ रियल इस्टेट एजंट्स पुणे या संघटनेने निवेदन दिले आहे. संघटनेचे अध्यक्ष सचिन शिंगवी यांनी सांगितले, “ऑनलाइन भाडेकरार नोंदवताना असंख्य अडचणी येत आहेत. यूआयडी सत्यापनात तांत्रिक अडचणी आल्याने ही सुविधा २ ते ६ जानेवारी या कालावधीत बंद होती. ही समस्या अजून कायम आहे. मंगळवारपासून भाडेकरू, मालक आणि साक्षीदार यांचे छायाचित्र भाडेकरारासाठी काढण्यात अडचणी येत आहेत. शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल ऑनलाइन भाडेकराराच्या माध्यमातून मिळत असूनही संकेतस्थळाची अवस्था अत्यंत बिकट आहे.”
भाडेकराराचे ब्राउजर इंटरनेट एक्स्प्लोररवर आधारित असून २०२१ मध्ये मायक्रोसॉफ्टने त्याचा सपोर्ट बंद करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याचाच भाग म्हणून अॅडॉब फ्लॅश प्लेयर बंद झाला आहे. परिणामी संकेतस्थळाच्या अडचणी वाढल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर नोंदणी महानिरीक्षकांनी तातडीने उपाययोजना करून, या सर्व समस्यातून मार्ग काढावा अशी मागणी शिंगवी यांनी केली आहे.
चौकट
बोटांचे ठसे ही मोठी समस्या
बोटांचे ठसे घेताना एका खासगी कंपनीचे थंब स्कॅनर वापरावे, अशी सक्ती भाडेकराराच्या संकेतस्थळावर होत आहे. हे यंत्र ३३०० रुपये किमतीचे असून , दरवर्षी देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली २९५ रुपये शुल्क आकारले जाते. तसेच २४ तासांत २५ चुकीचे बोटांचे ठसे झाल्यास संबंधित यंत्र २४ तासांसाठी बंद होते. ज्येष्ठ नागरिकांचे ठसे घेताना अनेकवेळा यंत्र ठसे स्वीकारत नाही. याबाबतही उपाययोजना करण्याची मागणी संघटनेने केली आहे.