पुणे : मोबाईलवर ऑनलाइन कर्जासंदर्भात आलेल्या लिंकवर क्लिक करून तिने कर्ज मिळविले; मात्र ते कर्ज फेडूनदेखील तिच्याकडे पुन्हा पैसे भरण्यासाठी तगादा लावण्यात आला. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी तिचे फोटो मॉर्फ करून ताे तिच्या संपर्क क्रमांकामधील लोकांना पाठवत बदनामी केली. हा प्रकार नुकताच येरवडा परिसरात उघडकीस आला.
अधिक माहितीनुसार, पीडित तरुणी ही एका फायनान्स कंपनीत नोकरी करते. तिच्या मोबाईलवर ऑनलाइन कर्जासंदर्भात एक लिंक आली होती. ती लिंक डाऊनलोड केल्यानंतर तिने त्या ॲपवर आपली सर्व वैयक्तिक माहिती भरली. त्याद्वारे तिला कर्ज मिळाले. त्यानंतर तिला दोन वेळा लिंक आल्या. त्याही तिने क्लिक करून कर्ज मिळवले. ते कर्ज तिने वेळेत फेडलेदेखील. तरीही तिला वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून आलेल्या फोनद्वारे अतिरिक्त पैशाची मागणी केली जाऊ लागली. मात्र तिने त्याकडे दुर्लक्ष केले.
ही तरुणी काहीच प्रतिसाद देत नसल्याचे पाहून सायबर चोरट्यांनी तिच्या मोबाईलच्या व्हॉट्सॲपवर तिचे छायाचित्र मॉर्फ करून तिच्या संपर्कातील व्यक्तींना पाठवले. हा प्रकार तरुणीला समजल्यानंतर तिने येरवडा पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधित मोबाईल धारकाविरुद्ध तक्रार दाखल केली. यासंदर्भात पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे तपास करीत आहेत.