पुणे: गेल्या रविवारी आयपीएलमधील क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्यांवर छापे टाकून गुन्हे शाखेने दोघा आंतरराष्ट्रीय बुकींना अटक केली होती़. त्यानंतर मंगळवारी रात्री सहकारनगर पोलिसांनी धनकवडीत एका बुकीवर कारवाई करुन त्याला अटक केली आहे़. राहुल सुभाष पांडे (वय ४८, रा. खडकमाळ आळी, घोरपडे पेठ) असे या बुकीचे नाव आहे़. पांडे याचा ऑनलाईन लॉटरी व्यवसाय आहे. त्यातूनच तो बुकी बनला असल्याचे आढळून आले आहे़.
याप्रकरणी सुशांत फरांदे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आयपीएल सामन्यांवर बेटिंग घेणाऱ्या दोघा आंतरराष्ट्रीय बुकींना गुन्हे शाखेने रविवारीच अटक केली होती़. त्यांच्याकडून तब्बल ९३ लाख रुपयांचा रोकड व अन्य साहित्य जप्त केले होते़. सहकारनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांना धनकवडीत आयपीएलवर सट्टा घेतला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक नितीन शिंदे, हवालदार भोसले, पोलीस अंमलदार शेंडे, सुळ यांनी धनकवडी येथील हिल व्ह्यु सोसायटीत राहुल पांडे याच्या घरावर छापा टाकला. तेथे आयपीएल सामन्यातील कोलकत्ता नाईट रायरडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल या सामन्यावर ऑनलाईन बुकिंग घेतले जात असल्याचे आढळून आले.
घरातील बेडरुममध्ये लॅपटॉप, टब व ३ मोबाईलच्या सहाय्याने बुकिंग घेत असल्याचे दिसून आले. मोबाईलच्या गॅलरीमध्ये जुगाराची आकडेवारी असलेल्या हिशोबाचे लॅपटॉपचे स्क्रिन शॉट व जुगाराची आकडेवारी असलेले वहीचे फोटो काढलेले दिसत होते. पोलिसांनी लॅपटॅप, टॅब, ६ मोबाईल, रोख १० हजार ६५० रुपये असा ५१ हजार ८१० रुपयांचे साहित्य जप्त केले आहे.
पोलिसांना एकूण ६ मोबाईल आढळून आले़, त्यापैकी तीन मोबाईलचा बेटिंगसाठी वापर झाल्याचे आढळले़. या ३ मोबाईलवरील सीम कार्ड हे लातूर येथील नागनाथ जाधव, बिबवेवाडीतील योगेश तलरेजा आणि सदाशिव पेठेतील तुषार खालकर यांच्या नावावर असलेले आढळून आले आहे. या तिघांच्या नावाने कागदपत्रे सादर करुन बेटिंगसाठी सीमकार्ड खरेदी केली असल्याचे आढळून आले आहे. पोलीस उपनिरीक्षक एस एस घाडगे अधिक तपास करीत आहेत.