पुणे : दर वर्षी गणेश मंडळांच्या परवानग्यांकरिता पोलिसांप्रमाणेच महापालिका प्रशासनाशी कार्यकर्त्यांचा संघर्ष होतो. तो संघर्ष टाळण्यासाठी मंडळांना आॅनलाईन पद्धतीने सर्व परवानग्या देण्याचा विचार सुरू आहे, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे पुण्यामधील राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडला. त्यावेळी त्या बोलत होते. खासदार अनिल शिरोळे, माजी आमदार उल्हास पवार, लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अंकुश काकडे, नगरसेवक हेमंत रासने, अजय खेडेकर, रवींद्र माळवदकर, अॅड. प्रताप परदेशी, गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, माणिक चव्हाण, सुवर्णयुग मंडळाचे अध्यक्ष सौरभ रायकर, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. यंदाचा जय गणेश भूषण पुरस्कार कॅम्प भोपळे चौकातील हिंद तरुण मंडळाला प्रदान करण्यात आला. धनकवडीतील आदर्श मित्र मंडळाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. टिळक म्हणाल्या, ‘गणेश मंडळे आणि कार्यकर्त्यांवरील खटल्यांबाबत पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सकारात्मक भूमिका घेण्याचे त्यांनी मान्य केले आहे. परंतु, आपणही आचारसंहिता ठरवली, तर पुढे अशा घटना घडणार नाहीत. महेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले़
गणेश मंडळांना आॅनलाईन परवानग्या
By admin | Published: June 28, 2017 4:15 AM