पुणे : कोरोनामुळे सर्वजण चिंतीत आहेत. सगळ्यांना ही वेळ लवकरात लवकर टळो अशी इच्छा आहे. कोरोनाच्या अरिष्टाने अनेकांचे जीव घेतले आहेत. आता तर पवित्र रमजान महिना सुरू झाला असून त्यावर देखील त्याचे सावट कायम आहे. अशावेळी कुणीही मशिदीत गर्दी करू नये असे आवाहन समाजतील ज्येष्ठ व्यक्तींनी केले आहे. आपल्यामुळे कुणाला कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता तसेच सर्वोतोपरी काळजी घेण्यासाठी 'ऑनलाइन प्रार्थना आणि प्रवचने' च्या माध्यमातून सुरक्षितता जपली जाणार आहे. दाउदी बोहरा समाजाच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
दिवसेंदिवस कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. नागरिकांच्या मनात भीती आहे. या सगळ्याचा परिणाम विविध सणावर होत आहे. मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. परंतु एकीकडे कोरोनाची भीती लक्षात घेऊन समाजातील बांधवांना घरात राहूनच नमाज अदा करण्यास सांगितले आहे. मशिदीत कुणी जायचे नाही, आता प्रार्थना ऑनलाइन करता येणार असून प्रवचने देखील ऐकता येणार असल्याने नागरिकांना फिजिकल डिस्टन्स ठेवणे सोपे होणार आहे. याविषयी अधिक माहिती देताना दाउदी बोहरा समाजाचे प्रवक्ते प्रा. कुरेश घोडनदीवाला म्हणाले, आमच्याकडे सैफी ऍम्ब्युलन्स नावाची संस्था आहे ज्या माध्यमातून नागरिकांना पॅरा मेडिकल सुविधा पोहचविण्यात येतात. समाजाचे धर्मगुरू सैदाना मुफ्फद्दल सैफउद्दीन साहेब यांच्या आदेशानुसार आणि जनाब आबदेअली भाईसाहेब नुरुद्दीन यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य ती काळजी घेतली जात आहे.
आता तर कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव लक्षात घेता ज्या भागात बोहरी समाज आहे त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यासाठी समाजतील तरुणांची एक टीम तयार केली आहे. त्याद्वारे कुणाला अन्नधान्य, औषधे पुरवण्यात येतात. यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. टीममधील दोन व्यक्ती सतत समाजातील व्यक्तींच्या संपर्कात असून त्यांना आवश्यक त्या सुविधा पोहचविण्यासाठी तत्पर आहेत.
शहरात किमान 35 ते 40 हजार बोहरी समाज आहे. या समाजातील 95 टक्के व्यक्ती या उद्योगधंद्यात सहभागी आहेत. रविवार पेठ, कसबा पेठ, कॅम्प, कोरेगाव पार्क, वानवडी, कल्याणीनगर, एनआयबीएम रोड, कोंढवा, उंड्री आणि हडपसर या परिसरात हा समाज विखुरला आहे. मुळात शांतताप्रिय, आणि शिस्तशीर म्हणून ओळख असलेल्या बोहरी समाजातील अनेक तरुणांनी स्वयंस्फूर्तीने कोरोनाच्या कामात मदत करण्यास पुढाकार घेतला आहे. काही करून नियमांचे पालन करणे आणि स्वतः बरोबर इतरांची देखील काळजी घेणं हे तत्व सर्वानी लक्षात ठेवले आहे. - प्रा. कुरेश घोडनदीवाला (बोहरी समाज)