पुणे : फेसबुकवर कुत्र्याच्या पिल्लाची विक्रीसाठी जाहिरात करुन ऑनलाईन पैसे घेतल्यानंतर पिल्लु न देता महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अनिकेत अनिल देशमुख (वय २५, रा. धानोरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी धानोरीतील एक ३४ वर्षाच्या महिलेने विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. अनिकेत देशमुख याने आपल्या फेसबुकवर कुत्र्याचे पिल्लु विक्रीसाठी फोटो अपलोड केले होते. फिर्यादी यांनी त्याच्याकडून रिट्रीव्हर जातीचे कुत्र्याचे पिल्लु विकत घेण्यासाठी त्याच्या गुगल पे अकाऊंटवर ९ हजार रुपये पाठवले.
त्यानंतर त्यांनी अनेक दिवस कुत्र्याच्या पिल्ल्याच्या डिलीव्हरीची वाट पाहिली. परंतु, त्याने पिल्लु आणून दिले नाही. त्यांनी चौकशी केल्यावर ते कुत्र्याच्या पिल्लाचा मृत्यु झाल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी ऑनलाईन पाठविले पैसे परत केले नाही. शेवटी त्यांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे फसवणूकीची फिर्याद दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक झेंडे अधिक तपास करत आहेत.