पुणे : राज्यात नवे वाळू धोरण जाहीर केल्यानंतर आता राज्य सरकारच वाळू विक्री करणार आहे. यातून राज्यभरात सुमारे ६५ वाळू डेपो तयार करण्यात आले असून, नागपूर विभागात सर्वाधिक ३५ वाळू डेपो तयार करण्यात आले आहेत. वाळू खरेदी करताना महाखनिज संकेतस्थळावरून आता थेट खरेदी करता येणार आहे. त्याची वाहतूक करण्यासाठीही ट्रकचे ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे.
तेलंगणा राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही राज्य सरकारने वाळू विक्रीचे नवे धोरण नुकतेच जाहीर केले. त्यानुसार सहाशे रुपये ब्रास या दराने वाळू विक्री करण्यात येत आहे. राज्यभरात सुमारे ६५ वाळू डेपो तयार करण्यात आले असून, सर्वाधिक वाळू डेपो नागपूर विभागात ३५ इतके तयार करण्यात आले आहेत. नागपूर विभागातील सोळा तालुक्यांमध्ये हे डेपो उभारण्यात आले आहेत. यापूर्वी राज्यात लिलाव पद्धतीने वाळू विकली जात होती. मात्र, ज्या ठिकाणी वाळू उपसा होत होता, अशा ठिकाणी या लिलावांना प्रतिसाद मिळतच नव्हता. त्यामुळे नवीन वाळू धोरणानुसार ज्या ठिकाणी वाळूची उपलब्धता आहे आणि वाळूचे लिलाव झालेले नाहीत, अशा ठिकाणी वाळू डेपो तयार करण्यास जिल्हा प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सध्याचे वाळू डेपो हे ज्या ठिकाणाहून जिल्हा प्रशासनाला महसूल उपलब्ध होत नव्हता, तीच ठिकाणे आता राज्याला महसूल देण्यात अग्रेसर आहेत.
नद्यांच्या प्रवासात मध्यभागापर्यंत सहसा वाळू उपलब्ध होत नाही. मात्र, मध्यभागापासून तिच्या शेवटच्या स्थानापर्यंत वाळूची उपलब्धता जास्त दिसून येते. त्यामुळेच राज्यातील नागपूर विभागात असलेल्या बहुतांश नद्यांमध्ये वाळूची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळेच सध्या राज्यात उपलब्ध असलेल्या ६५ वाळू डेपोंपैकी निम्म्याहून अधिक वाळू डेपो हे नागपूर विभागात आहेत. पुणे विभागाचा विचार करता सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या नद्यांना त्यांच्या पात्रांमध्ये वाळू उपलब्धता कमी आढळते म्हणूनच या ठिकाणी वाळू डेपोंची संख्या कमी दिसून येते.
वाळू विक्री करताना आता राज्य सरकारने महाखनिज या संकेतस्थळावरून वाळू विक्री उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार नोंदणी केल्यानंतर आपल्याला हव्या त्या ठिकाणच्या वाळूची खरेदी करता येते. त्याचप्रमाणे त्या वाळूची वाहतूक करण्यासाठी ट्रकही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. वाळू खरेदी केल्यानंतर संबंधित ट्रकचा क्रमांक निवडल्यानंतर ठरावीक काळामध्ये त्या ट्रकच्या माध्यमातून आपल्याला घरपोच वाळू मिळू शकते. ट्रकचे भाडे मात्र, संबंधित मालकाशी बोलल्यानंतर व भाडे दिल्यानंतर ही वाळू वाहतूक करून मिळते. या संकेतस्थळावर सर्व डेपोंमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या वाळूची ब्रासमध्ये माहिती मिळते. दररोज निर्माण होणाऱ्या व विक्री होणाऱ्या वाळूचीदेखील या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध असते. त्यामुळे नागरिकांना या संकेतस्थळाचा मोठा फायदा होत आहे.
उपलब्ध वाळू डेपो
विभाग तालुके डेपो
पुणे ९ १८
नागपूर १६ ३५
अमरावती ४ ४
संभाजीनगर ७ ८
एकूण ३६ ६५