बालभारतीतर्फे सर्व शिक्षा अभियानांतर्गत राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकाचे वितरण केले जाते. मात्र, पुस्तक छापण्यासाठी लागणा-या कागदावरून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे यंदा तब्बल २ कोटी पुस्तकांची छपाई शाळा सुरू होण्यापूर्वी करता आली नाही. तसेच शासनाकडूनही बालभारतीला पुस्तक वितरणाबाबतचे आदेश लवकर प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तके उपलब्ध होऊ शकली नाही.
पुणे जिल्ह्यातील काही शाळांना मोफत पुस्तकांचे वितरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु, अद्याप सर्व शाळांपर्यंत पुस्तके पोहोच झाली नाहीत. परिणामी अनेक विद्यार्थी पुस्तकांच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच शिक्षण विभागातर्फे काही ब्रीज कोर्स तयार करण्यात आले आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांकडे मागील वर्षातील पुस्तके असणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून पुस्तके जमा करून घेतली गेली नाही.
----------
शिक्षण विभागातर्फे सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत मोफत पुस्तकांचे वितरण केले जाते. जिल्ह्यात वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. ब्रीज कोर्समुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून जुनी पुस्तके जमा करून घेतली नाहीत. त्यामुळे विद्यार्थी त्या आधारे अभ्यास करत आहेत.
- स्मिता गौड, प्राथमिक शिक्षण अधिकारी
------------------------------
शाळेकडून आॅनलाईन वर्ग घेतले जातात. पण माझ्यासह अनेक विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली नाहीत. त्यामुळे शिक्षण घेताना अडचणी येत आहेत. पुस्तके लवकर मिळावीत ही आमची अपेक्षा आहे.
- ओम भालेराव, विद्यार्थी
----------------
पुस्तकांशिवाय अभ्यास करता येत नाही. त्यामुळे शाळेतून पुस्तके केव्हा मिळतात याची आम्ही वाट पाहत आहोत. आॅनलाईन वर्गांत शिकवलेला अभ्यास पुस्तक नसल्यामुळे समजत नाही.
स्नेहल सूर्यवंशी, विद्यार्थी
-------
जिल्ह्यातील वर्गनिहाय विद्यार्थी संख्या
पहिली - १,९०,०६१
दुसरी-१,९२,५९२
तिसरी-१,९०,१३१
चौथी-१,९०,५७५
पाचवी -१,८६,९९६
सहावी -१,८३,२१४
सातवी -१,७७,८७३
आठवी -१,७०,८२२
------