पुणे : दिवाळी जवळ आल्यामुळे वस्तू, साहित्य, कपडे ऑनलाइन माध्यमातून विकत घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, ऑनलाइनखरेदी करताना माेबाइल स्क्रीनवर असलेल्या विविध वस्तुंवरील भरघाेस सूट आणि ती तत्काळ घेण्याचा माेह तुम्हाला सायबर गुन्हेगारांनी टाकलेल्या जाळ्यात अडकवू शकताे. त्यामुळे याेग्य खबरदारी घेत नागरिकांनी ऑनलाइन खरेदी करावी. व्यवहार करताना बँक खाते क्रमांक, पासवर्ड आणि डेबिट- क्रेडिट कार्डचा तपशील काेणालाही न देता खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.
बाजारात प्रत्यक्षात जाऊन साहित्य, वस्तू आणि कपड्यांची खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन माध्यामाद्वारे खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. नागरिकांच्या याच सवयीचा सायबर गुन्हेगार फायदा उचलत आहेत. विविध कंपन्या, कार्यालयाचे संकेतस्थळ हॅक करून बनावट संकेतस्थळ तयार करीत त्यावर स्वत:चा क्रमांक देत आहेत. वस्तूचा दर्जा, तसेच सेवा पुरविण्यासंदर्भात नागरिकांनी संपर्क साधल्यानंतर सेवा देणे, तसेच रक्कम पुन्हा बँक खात्यात जमा करण्याच्या बहाण्याने बँक खाते तसेच डेबिट, क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती घेत बँक खात्यातून रक्कम काढून घेण्याच्या प्रकारातही वाढ झाली आहे.
सायबर गुन्हेगारांचे बनावट साइटचे जाळे-
इंटरनेटवरील सर्च इंजीनवर विविध कंपन्यांचे कस्टमर केअर क्रमांकावर डोळे झाकून विश्वास ठेवणेही धोक्याचे ठरत आहे. सायबर गुन्हेगारांनी संकेतस्थळावर कस्टमर केअरच्या नावे बनावट क्रमांकाचे जाळे पसरविले असून त्या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर नागरिकांची रक्कम परत करणे, तसेच सेवा देण्याच्या नावाखाली बँक तसेच कार्डची गोपनीय माहिती घेत नागरिकांच्या बँक खात्यातून रक्कम गायब करीत आहेत.