पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त शहरात पोलिसांच्या वाहतूक शाखेतर्फे वाहतुकीत काही बदल केले जाणार आहेत. यासह शहरात यावर्षी पालख्यांचे ऑनलाइन ट्रॅकिंग केले जाणार आहे. पालखीच्या सर्वांत पुढील दिंडी व शेवटी असलेल्या दिंडीची माहिती पोलिसांबरोबर नागरिकांना ऑनलाइन बघता येणार आहे. रस्ते आधीच बंद करण्याऐवजी यंदा या ऑनलाइन ट्रॅकिंगनुसार वाहतूक पोलिस रस्त्यावरील वाहतुकीचे नियोजन करणार आहेत. नागरिकांना त्रास होणार नाही आणि पालखीला अडथळा येणार नाही, अशा दृष्टीने हे नियोजन करण्यात आले आहे. यासंबंधीची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर यांनी बुधवारी दिली.
संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या १२ जून रोजी पुण्यात दाखल होत आहेत. त्यासाठी वाहतूक पोलिसांकडून नियोजन केले जात आहे. यावर्षी वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी ‘माय सेफ ॲप’च्या माध्यमातून पालख्या ऑनलाइन ट्रॅकिंग केल्या जाणार आहेत. त्यामुळे पालख्यांचे लोकेशन समजणार असल्याने थेट नियंत्रण कक्षातून रस्ते बंद करण्याचे नियोजन केले जाणार आहे. तसेच, पालख्यांच्या लाइव्ह लोकेशनची माहिती नागरिकांना पोलिस आयुक्तांच्या नावे असलेल्या सोशल मीडियावरून दिली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनाही पालखी कुठे आहे, याची माहिती मिळणार आहे. पालखी मार्गावरील अंतर्गत रस्ते लवकर बंद केल्यामुळे दरवेळी अडचणी निर्माण होतात. पण, यावेळी पालख्या जवळ आल्यानंतर रस्ते बंद केले जाणार आहेत. तसेच, महत्त्वाच्या चौकात रोपच्या सहाय्याने रस्ता बंद केला जाईल. वाहनांची गर्दी झाल्यास त्यांना रोप काढून रस्ता ओलांडण्यास मदत केली जाणार आहे. नागरिकांचे हाल होणार नाहीत, याची दक्षता घेतली जाणार आहे. पण, पालखी मार्गाला अडथळा निर्माण होईल, अशी वाहतूक सुरू ठेवली जाणार नाही. तसेच, काही महत्त्वाच्या ठिकाणी अनाऊन्सिंग सिस्टिम ठेवली जाणार आहे, असेही मगर यांनी सांगितले.
पालखी मार्गावर १ हजार वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. यामध्ये ९७५ कर्मचारी व ६० अधिकाऱ्यांचा समावेश आहे. प्रत्येक महत्त्वाच्या चौकात वाहतूक पोलिसांसह स्थानिक पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. त्यादृष्टिने स्थानिक पोलिसांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. रस्ते बंद करताना नियंत्रण कक्षाला कळवूनच ते बंद केले जाणार आहेत, असे उपायुक्त मगर यांनी सांगितले.
मेट्रोचे काम बुधवारपासूनच बंद...
पालखी मार्गावर असलेल्या शिवाजीनगर येथे मेट्रोचे काम सुरू आहे. पालख्या येत असल्यामुळे शिवाजीनगर परिसरातील मेट्रोची कामे ७ ते १२ जूनदरम्यान बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार मेट्रोने बुधवारपासून काम बंद केले आहे.