लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयटी आणि इतर कंपन्यांकडून ‘वर्क फ्रॉम होम’ जाहीर केले आहे. घरात बसून काम एके काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काम करता करताच पर्यटनाचा आनंद लुटता यावा यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) ‘वर्क फ्रॉम होम’च्या धर्तीवर ‘वर्क फ्रॉम नेचर’ ही संकल्पना आणली आहे. एमटीडीसीच्या पर्यटनस्थळावरील रिसॉर्टमध्ये मोफत वायफाय झोन सुविधा दिली आहे. टप्प्याटप्प्याने राज्यभरातील ’एमटीडीसी’ च्या सर्व रिसॉर्टवर अशी सुविधा दिली जाणार आहे.
कर्मचाऱ्यांना कामाच्या व्यापामुळे इच्छा असूनही पर्यटनाला जाता येत नाही. सतत घरात बसून एक प्रकारचा मानसिक थकवा जाणवतो. त्यांच्या क्रयशक्तीवरही परिणाम होतो. नोकरदारवर्गाची जशी अडचण होते तशीच विविध प्रकल्पांवर काम करणारे अधिकारी, गुंतवणूकदार किंवा व्यापारी, उद्योजकांचीही अडचण होते. अशा सर्वच घटकांना निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेत कामही करता यावे, यासाठी एमटीडीसीने ही खास सुविधा दिली आहे. त्यामुळे आता चार-पाच दिवसांची सुटी घेत रिसॉर्टवर जाउन ठराविक वेळेत काम व उर्वरित वेळेत पर्यटनाचा आनंद घेणे शक्य आहे. या सुविधेमुळे कामात येणारे अडथळे दूर होण्यास मदत होईल. याशिवाय रोज त्याच त्या ठिकाणी बसून काम करण्याचा आलेला कंटाळा घालवून निसर्गाच्या सानिध्यात राहून चांगले काम करता येणे शक्य होणार आहे, असे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पुणेचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी सांगितले.
----
एमटीडीसीने राज्यातील विविध रिसॉर्टवर वायफाय सुविधा दिली आहे. यात पर्यटन झोनवरील सुविधा मोफत आहेत, तर एखाद्या पर्यटकाने मागणी केल्यास त्याच्या निवासी कक्षातही अशी सुविधा देण्यात येईल. पहिल्या टप्प्यात कोयनानगर, माथेरान, महाबळेश्वर येथे अशी सुविधा दिली आहे. यापुढील टप्प्यात तारकर्ली, गणपतीपुळे, माळशेजघाट, पानशेत येथील रिसॉर्टवर ही सुविधा देण्यात येईल. तथापि, पर्यटकांना कोरोनाची धास्ती न घेता महामंडळाच्या पर्यटक निवासात यावे. या ठिकाणी पर्यटकांना सर्व सुविधा आणि कोरोनाबाबतची योग्य ती सर्व खबरदारी घेतली आहे. त्यामुळे निसर्गाचे भान ठेवून आणि कोरोना बाबत दक्षता घेऊन बिनधास्त पर्यटन करावे.
-दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पुणे
----
चौकट
महाबळेश्वर, माथेरान, कोकणासाठी मोठ्या प्रमाणावर बुकिंग
येत्या २७ ते २९ मार्च आणि २ ते ४ एप्रिल अशा सलग सुट्यांमुळे पर्यटक आणि आयटी क्षेत्रातील कर्मचारी पर्यटनाच्या मूडमध्ये आहेत. सुटी निसर्गाच्या सन्निध्यात घालविण्यासाठी एमटीडीसीच्या महाबळेश्वर, माथेरान, माळशेज घाट आणि कोकणामधील रिसोर्टसाठी सर्वात जास्त बुकिंग झाले असल्याची माहिती हरणे यांनी दिली.