पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार राज्याची प्रारुप मतदाय यादी जाहीर करण्यात आली असून त्या ५ जानेवारीच्या तुलनेत तरुण मतदारांची संख्या कमालीची घटल्याचे समोर आले आहे. लोकसंख्येत १८ व १९ वर्षांच्या तरुणांचे प्रमाण ३.७६ टक्के असले तरी मतदार यादीतील प्रमाण केवळ ०.२७ टक्केच आहे. त्यामुळेच मतदानासारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेत तरुणांचा सहभाग वाढविण्यासाठी महाविद्यालायंमधून तरुणांची मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. येत्या नऊ नोव्हेंबर ते नऊ डिसेंबर दरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यात महाविद्यालयांनी सहभाग घेण्याचे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.
प्रारुप यादीनुसार राज्यात राज्यात ९ कोटी ८ लाख ३२ हजार २६३ मतदार मतदार आहेत. आयोगाने प्रसिद्ध केलेल्या ५ जानेवारीच्या अंतिम मतदार यांदीच्या तुलनेत मतदारांची संख्या पाच लाखांनी वाढली असून आणखी पाच लाख मतदार वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, तरुणांची संख्या कमीच असल्याचे आढळले आहे. त्यामुळे तरुण मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. या यादीनुसार वयाची १८ व १९ वर्षे पूर्ण केलेल्यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ३.७६ टक्के अर्थात ४७ लाख ८३ हजार ७० इतकी आहे. मात्र, प्रारुप मतदार यादीत या वयोगटाची टक्केवारी केवळ ०.२७ टक्केच अर्थात ३ लाख ४८ हजार ६९१ इतकी आहे. तर २० ते २९ या वयोगटाची एकूण लोकसंख्येतील टक्केवारी २०.३८ (२ कोटी ५९ लाख २९ हजार २०६) इतकी आहे. तर प्रारुप यादीत हेच प्रमाण १२.१९ टक्के अर्थात १ कोटी ५५ लाख ११ हजार ३७६ इतके आहे.
मतदार यादीतील हे प्रमाण निराशाजनक आहे. ही बाब गंभीर असून त्याची दखल घेण्यात आली आहे. त्याकरिता नऊ नोव्हेंबर ते नऊ डिसेंबरदरम्यान राज्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यासाठी विशेष शिबिरे घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. त्याकरिता राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांची मदत घेण्यात येईल. महाविद्यालयांमध्ये संगणक प्रयोगशाळा असल्यास त्यामार्फत विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल. त्यांच्याद्वारे अन्य विद्यार्थ्यांचे मतदार अर्ज भरले जातील. अन्यथा ऑफलाइन पद्धतीने नोंदणी अर्ज देऊन भरून घेतले जातील.त्यासाठी प्राचार्यांची मदत घेतली जाईल. त्या करिता प्राचार्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.
दरम्यान, नऊ नोव्हेंबरपासून महाविद्यालये बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॉलेजात जाऊन किती विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे किंवा किती जणांची नोंदणी राहिली आहे याची माहिती घेता येईल. ज्यांची नोंदणी झाली नाही त्यांच्यापर्यंत पोचता येईल, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात १ ते ७ नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक गावात विशेष ग्रामसभा आयोजित करण्याच्या सूचना केल्या आहेत. ग्रामसभेत मतदारयादीचे जाहीर वाचन करून सुटलेले मतदार ओळखून त्यांचा मतदार यादीत समावेश केला जाणार आहे. ४ ते ५ नोव्हेंबर आणि २५ ते २६ नोव्हेंबरला अनुक्रमे शनिवार, रविवार आहे. त्या दोन्ही दिवशी ‘बीएलओ’ हे त्यांच्या मतदान केंद्राच्या ठिकाणी उपस्थित राहतील. त्यावेळी मतदारांनी नाव तपासणे, अर्ज भरण्यास जावे. तेथे त्यांना मदत मिळू शकेल.- श्रीकांत देशपांडे, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र