पुणे : चार ते पाच वर्षांपासून शहरात दुचाकींचे वाढते अपघात आणि त्यांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वारंवार वाढत असल्याने कायद्याने बंधनकारक असलेले हेल्मेट वापरण्याबाबत पोलिसांकडून सक्ती केली जात आहे. शहरातील वाढती वाहनांची संख्या आणि वाहतूककोंडी यामुळे वाहनांचा २० ते ३० किलोमीटरच वेग असल्याने अपघात झाला तरी मृत्यू होणार नाही, अशी भूमिका शहरातील स्वयंसेवी संस्था तसेच काही राजकीय नेत्यांकडून घेतली जात आहे. मात्र, प्रत्यक्षात वाहनाचा वेग आणि खाली पडून डोक्याला मार लागण्याचा अवघा १० टक्केच संबंध असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. एखादा वाहनचालक १० किलोमीटर वेगाने चालविताना गाडीवरून तोल जाऊन पडला, तरी डोक्याला गंभीर जखम होऊन मृत्यू ओढवू शकतो. तर, हेल्मेटमुळे हा डोक्यावर होणारा आघात कमी प्रमाणात होऊन प्राण वाचण्याची शक्यता ९० टक्क्यांनी वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.हेल्मेटसक्तीला होत असलेला विरोध लक्षात घेऊन पोलिसांनी एक मध्यम मार्ग काढला. कोणताही वाहतूक नियमभंग केल्यास त्याच्यासोबत हेल्मेट कारवाई केली जाऊ लागली. ती अद्याप सुरू आहे. वेळोवेळी वाहतूक शाखेकडून हेल्मेट कारवाई केली जाते. तर, काही महिन्यांपूर्वी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी औरंबादनंतर पुण्यातही सक्ती करण्याचे सूतोवाच करताच वाहतूक पोलीसही बाह्या सरसावून कारवाईसाठी उतरले. विशेष म्हणजे, औरंगाबादमध्ये आधी जनजागृतीसाठी एका महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. पोलिसांकडूनही आक्रमक भूमिका घेण्यात आल्याने शहरातील स्वयंसेवी संस्था तसेच लोकप्रतिनिधींनी त्याला विरोध करून शहरातील वाहनांचा वेग हा प्रतितास ३० किलोमीटरही नसल्याने अपघात झाला, तरी फारशी इजा होणार नाही, अशी भूमिका घेऊन सक्ती मागे घेण्यासाठी दबाब टाकला जात आहे. विशेष म्हणजे, औरंगाबादमध्ये आधी जनजागृतीसाठी एका महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. पोलिसांकडून ही आक्रमक भूमिका घेण्यात आल्याने शहरातील स्वयंसेवी संस्था तसेच लोकप्रतिनिधींनी त्याला विरोध करून शहरातील वाहनांचा वेग हा प्रतितास ३० किलोमीटरही नसल्याने अपघात झाला, तरी फारशी इजा होणार नाही, अशी भूमिका घेऊन सक्ती मागे घेण्यासाठी दबाब टाकला जात आहे. हेल्मेट आणि वाद हे पुण्यातले एक प्रकारचे समीकरण झालेले आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांच्यापासून सुरू झालेले हेल्मेटसक्ती राबविण्याचे प्रयत्न अद्यापही सुरूच आहेत. परंतु, वेळोवेळी झालेली सक्ती हाणून पाडली गेली. मध्यंतरी तर कॅन्टोन्मेंट भागात हेल्मेटसक्ती राबविण्यात आली होती. लष्करी अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे शहरातील काही भागांत हेल्मेटसक्ती, तर काही भागात सक्ती नसल्याचे चित्र निर्माण झाले होते. वाहनाचा वेग आणि अपघाताचा संबध आहेच; पण वाहन कमी वेगात असले म्हणजे डोक्याला गंभीर इजा होणार नाही. त्यामुळे हेल्मेट घालणे हा पर्याय नाही, असे म्हणणे वैद्यकीयदृष्ट्या चुकीचे आहे. अनेकदा घरात अथवा बाथरूममध्ये घसरून डोक्याला गंभीर इजा होतात. त्यामुळे वाहन चालविताना हेल्मेट वापरणे चालकासाठीच आवश्यक आहे. हेल्मेटमुळे डोक्याला होणाऱ्या गंभीर इजा रोखल्या जाऊ शकतात. त्यामुळेच ज्या ठिकाणी वाहनांची संख्या मोठी आहे, अशा परदेशातील आणि भारतातील शहरांमध्ये हेल्मेटसक्ती आहे. त्यामुळे वेग हे हेल्मेट न घालण्याचे कारण आहे, असे म्हणता येणार नाही. - डॉ. पराग संचेती (ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ)वाहनाचा वेग व डोक्याला मार लागणे यांत केवळ १० टक्केच संबंध आहे. कोणतीही व्यक्ती पडताना तिचा प्रमुख संबंध तिच्या शरीराची लवचिकता, पडण्याची स्थिती आणि तिचे वजन यांवर अवलंबून असते. एखादी व्यक्ती गाडीवरून पडल्यास प्रामुख्याने डोक्याला मार लागून रक्तस्राव होणे, कवटीला इजा (फ्रॅक्चर) होणे, तसेच मणका फ्रॅक्चर होणे या गंभीर दुखापती होण्याची दाट शक्यता असते. अशा वेळी व्यक्तीच्या डोक्यावर हेल्मेट असल्यास हा डोक्यावर होणारा आघात हेल्मेटवर होऊन ८० ते ९० टक्के आघात हेल्मेटवर होतो. त्यामुळे गंभीर इजा होण्याचा धोका कमी प्रमाणात असतो. - डॉ. अविशान भोंडवे (इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र उपाध्यक्ष )
वेग अन् इजा होण्याचा फक्त १० टक्के संबंध
By admin | Published: April 13, 2016 3:34 AM