पुणे शहरात कोरोना रुग्णांना पुन्हा एकदा बेडची शोधाशोध करायची वेळ आली आहे. प्रशासनाच्या अहवालानुसार पुणे महापालिकेला शहरात साधारण २६०० बेड कमी पडत आहेत. हेच लक्षात घेता नियोजनाला सुरुवात करण्यात आली असुन आता सर्व रुग्णालयांचे ८०% बेड ताब्यात घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
पुणे शहरातल्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काल एकाच दिवसात जवळपास ४००० पेक्षा जास्त नवे रुग्ण सापडले होते. अनेक रुग्णांना बेड मिळवण्यासाठी पळापळी करावी लागत आहे. शहरातल्या प्रमुख रुग्णालयांचे तर सर्व प्रकारचे बेड पुर्ण भरले आहेत.
डॅशबोर्ड वरील आकडेवारीनुसार शहरात साधारण 5008 बेड आहेत. यापैकी फक्त ४९० बेड शिल्लक आहेत. यामध्ये साधे बेड २४३, ॲाक्सिजन बेड २१७, व्हेंटिलेटर शिवायचे आयसीयु बेड २० तर फक्त १० व्हेंटिलेटर बेड शिल्लक आहेत.
प्रशासनाच्या आकडेवारीनुसार सप्टेंबर मध्ये जेव्हा सर्व रुग्णालयातील ८०% बेड ताब्यात घेण्यात आले होते तेव्हाची आणि आत्ताची आकडेवारी पाहता शहरात साधारण २६८२ बेड कमी पडत आहेत.
याच पार्श्वभुमीवर आता खासगी रुग्णालयातील बेड ताब्यात घेण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरु केली आहे. याबाबत बोलताना पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल म्हणाल्या ,” याच संदर्भात प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक झाली. शहरातील खासगी रुग्णालयातील ८०% बेड पुन्हा ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत”