लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यासह जिल्ह्यात जानेवारी महिन्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली, पण सहा महिन्यांत जिल्ह्यातील केवळ ११ टक्के लोकांचे कोरोना लसीकरण पूर्ण म्हणजे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. तर ४२ टक्के लोकांनी पहिला डोस घेतला आहे. दरम्यान केंद्र शासनाने आता पुरेशा प्रमाणात लसची डोस उपलब्ध करून देणार असल्याचे म्हटले असून, जिल्ह्यात दिवसाला दीड लाख लोकांचे लसीकरण करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
जिल्ह्यात १५ जानेवारीनंतर कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. पुणे जिल्ह्यात दिवसाला ५०-५५ हजार लोकांचे लसीकरण होत असे. परंतु केंद्र शासनाने १८ ते ४५ वयोगटातील सरसकट सर्वांचा लसीकरणाचा निर्णय घेतला आणि लसीचा तुटवडा झाला. लस उपलब्ध होत नसल्याने पुणे शहरामध्ये काही दिवस लसीकरण बंद ठेवण्याची वेळ देखील प्रशासनावर आली. आताही लस उपलब्ध होण्याच्या प्रतीक्षेत प्रशासन आहे.
जिल्ह्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स ज्येष्ठ नागरिक यांचे देखील लसीकरण अद्याप पूर्ण झाले नाही. तर १८ ते ४४ दरम्यान केवळ २२ हजार ८८ म्हणजे एक टक्का लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.े
-------
- जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी एकूण अपेक्षित लाभार्थी : ५७ लाख ७५ हजार ४२६
- पहिला डोस घेतलेले नागरिक : २४ लाख ५३ हजार ४५६ (४२ %)
- दूसरा डोस घेतलेले नागरिक : ६ लाख ५५ हजार ६०६ ( ११ टक्के )
-------
१८ ते ४४ वयोगटातील केवळ एक टक्का लोकांचे लसीकरण
केंद्र शासनाने १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे देखील लसीकरण सुरू केले आहे. जिल्ह्यात या वयोगटातील सुमारे २५ लाख ३५ हजार ४२६ लाभार्थी अपेक्षित आहेत. यापैकी ४ लाख १६ हजार ७६५ लोकांनी पहिला तर दुसरा डोस घेतलेल्या लोकांची संख्या केवळ २२ हजार ८८ म्हणजे एक टक्काएवढी आहे.
-------
लस उपलब्ध झाल्यास दिवसाला दीड लाख लसीकरणाचे उद्दिष्ट
सध्या शासनाकडून ज्या प्रमाणात लस उपलब्ध होईल तसे लसीकरण सुरू आहे. परंतु २० जूननंतर शासनाकडून मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होईल असे सांगितले जात आहे. लस उपलब्ध झाल्यास शहर आणि ग्रामीण भागात दिवसाला तब्बल दीड लाख लोकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले असून, तशी सर्व तयारी केली आहे.
- डाॅ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी
----------------------------------