पुणे : जिल्ह्यातील धरणांची पाणी पातळी खालवली असून पुणे महापालिकेला व परिसरातील गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पात केवळ १२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षापेक्षा धरणात ४.४५ टीएमसी पाणीसाठा कमी आहे. जिल्ह्यातील बहुतांश धरणे केवळ ३५ ते ५० टक्के भरलेली आहेत.
पुणे जिल्ह्यातील सिंचनाला आणि नागरिकांना पिण्यासाठी पाणी पुरवठा करणाºया धरणांमधील पाणीसाठ्यात चांगलीच घट झाल्याचे दिसून येत आहे. धरणातील पाणीसाठा कमी असल्याने सिंचनाऐवजी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळेच खडकवासला धरणातून दौंड, इंदापूरसाठी सोडले जाणारे उन्हाळी आवर्तन यंदा सोडले जाणार नाही, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांकडून सांगितले जात आहे. खडकवासला धरण प्रकल्पात मागील वर्षापेक्षा यंदा चार टीएमसीपेक्षा अधिक पाणीसाठा कमी असला तरी शेतीसाठीचे उन्हाळी आवर्तन रद्द केल्यामुळे पुणे महापालिका व परिसरातील गावांना आवश्यक असणारे पाणी पुरणार आहे.
मात्र, ग्रामीण भागातून उन्हाळी आवर्तन सोडण्यासाठी दबाव निर्माण झाला तर पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. सध्या जिल्ह्यातील भामा आसखेड, आंद्रा, पवना, कासारसाई, खडकवासला आणि वीर या धरणांमध्येच ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. उर्वरित सर्व धरणातील पाणीसाठा सुमारे ३० ते ४० टक्क्यांच्या खाली आहे. फेब्रुवारी महिन्यातच एकट्या पुणे जिल्ह्यात ६४ टँकरने नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे.