भोर: तालुक्यात दरोडे, घरफोड्यांचे सत्र थांबायचे काही नाव घेत नाही. पोलिसांचा वचक न राहिल्यामुळे या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. गेल्या दोन वर्षात ४४ घरफोडी व दरोड्यापैकी केवळ १७ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीस प्रशासनाला यश मिळाले आहे. उर्वरीत गुन्ह्याचा तपास सुरु असून नागरिकांतून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे.
भोर शहरात व तालुक्यात वारंवार बंद घरांचे दरवाजे तोडून छप्परावर चढून घरात घुसुन चोऱ्या होत आहेत. यामुळे घरे बंद ठेवून काही कामानिमित्त बाहेरगावी जाण्यास नागिरक घाबरत आहेत. तालुक्यात २०१९ मध्ये २४ घरफोड्या व दरोड्याचे प्रकार घडलेत त्यातील फक्त ६ प्रकरणांचा तपास करण्यात पोलीसांना यश आले आहे. तर २०२० मध्ये २० घरफोडी व दरोड्याचे प्रकार घडलेत त्यात फक्त ११ गुन्हे उघडकीस आले आहेत. २७ घरफोडी आणी दरोडयाचा तपास अदयाप लागलेला नाही. तर बरेच घरफोड्यांमधे काहीच मुद्देमाल चोरीस गेला नसल्यामुळे पोलीसांनी गुन्हाच दाखल करून घेतलेला नाही. त्यामुळे पोलीसांच्या कामकाजाबददल नागरिक नाराजी व्यक्त करित आहेत.
अनेकदा चोरीसाठी घरातील लोकांवर हल्ले होण्याचेही प्रकार घडत आहेत.यामुळे नागरीकांत घबराहट पसरली असुन वारंवार होणाऱ्या घरफोड्या बघून नागरिक मात्र घर बंद करून बाहेरगावी जाण्याची भीत आहेत.त्यामुळे पोलीसांनी लक्ष देऊन चोरीचे तपास करुन गून्हा उघड करणे गरजेचे आहे.माञ तसे फारसे गांभिर्य दिसत नाही.
अपुऱ्या पोलीस बळामुळे तपासात अडचणी
शहरात होणाऱ्या घरफोडया दरोडयाबाबत नागरीकांना सर्तक करण्यात येत असून ग्रामीण भागातही ग्रामसुरक्षा समितीच्या
माध्यमातून सुरक्षेबाबत गस्त घालण्याच्या सुचना दिल्या आहेत. चोऱ्याचे तपास सुरु आहेत माञ अपुरे पोलीस बळ असल्या मुळे गुन्हेगार पकडण्यात अडचणी येत असल्याचे पोलीस निरीक्षक राजू मोरे यांनी सांगितले.