पळसदेव : उजनीचे पाणी दररोज मोठ्या प्रमाणावर कमी होत असल्याने उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रालगतचा (बॅक वॉटर) शेतकरी धास्तावला आहे. सध्या उजनी धरणात २०.७१ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने मे महिन्यात काय परिस्थिती ओढावेल, याची चिंता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. उजनी धरणातून मागील आठवड्यात चैत्रवारीसाठी भीमा नदीत पाणी सोडणे सुरू केले आहे. मात्र, सोमवारी दुपारी उजनी धरण व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता, पाणी सोडणे बंद केले आहे. सध्या उजनी धरणात २०.७१ टक्के पाणीसाठा असल्याचे सांगितले. उजनीच्या पाण्यावरच निम्म्या तालुक्याचे अर्थकारण आहे. भिगवण ते हिंगणगावपर्यंतचा पट्टा उजनीच्या पाण्यावर अवलंबून असतो. शेतीसाठी लागणारे पाणी, औद्योगिक वसाहती व साखर कारखानेसुद्धा उजनीच्या पाण्यावरच अवलंबून आहेत. त्यामुळे उजनीला इंदापूर तालुक्याची वरदायिनी समजले जाते. उजनीच्या पाणलोट क्षेत्रात ऊस हे मुख्य पीक घेतले जाते. मात्र, गेल्या आठ दिवसांत उजनीची पाणीपातळी मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. शेतीला पाणी मिळावे यासाठी शेतकऱ्यांना पाईपची संख्या वाढविणे, केबलची (वायर) लांबी वाढविणे आदी गोष्टी कराव्या लागत आहेत. मात्र दिवसेंदिवस कमी होत असलेल्या पाणीपातळीमुळे मे महिन्यात धरणात किती साठा शिल्लक राहणार अशी चिंता सध्या शेतकरी व्यक्त करीत आहेत. वास्तविक उजनीच्या पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. ज्यांनी उजनी धरणासाठी जमिनी दिल्या त्या शेतकऱ्यांवरच एक प्रकारे अन्याय केला जात असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंत्री, नेतेमंडळींनी ओरड केली की पाणी सोडले जाते. मात्र इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनीधी मात्र याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. (वार्ताहर)
उजनीत केवळ २०.७१ टक्के पाणी
By admin | Published: April 07, 2015 5:33 AM