पुणे : सर्वात मोठा पसारा असणारे उजनी धरण यंदा १०० टक्के भरले होते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये धरणात बराच पाणीसाठा शिल्लक राहिल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. तसेच सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यात उन्हाळ्यात मुबलक पाणी मिळेल असा अंदाज होता. मात्र,गेल्या चार ते पाच महिन्यात उजनीतून मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा झाल्यामुळे धरणात सध्या केवळ २२.९० टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या दुस-या आठवड्यातच भीमा खो-यातील धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक झाली आहे.आत्तापासूनच पाण्याचे योग्य नियोजन केले नाही तर उन्हळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.भीमा खो-यातील धरणांमधील एकूण पाणीसाठा 50 टक्क्यांच्या आसपास आहे. त्यातही पुणे जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा चांगलाच खालवल्याचे दिसून येत आहे. यंदा मान्सूनचे आगमन लांबले.तसेच सप्टेबर महिन्यापर्यंत राज्यात बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. पुणे जिल्ह्यासह भीमा खो-यातील अनेक धरणे शंभर टक्क्यांपर्यंत भरली. त्यामुळे शेती आणि पिण्यासाठी पाणी पुरेल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, सप्टेबर महिन्याच्या दुस-या आठवड्यापासून परतीच्या पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत पाणीसाठा चांगलाच खालवला. सध्या थंडीचा कालावधी असल्याने धरणामधील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्याप्रमाणात होत नाही. परंतु, पुढील चार ते पाच महिन्यात बाष्पीभवनाचे प्रमाण वाढणार आहे. परिणामी धरणाची पाणीपातळी चांगलीच खालवणार आहे. त्यामुळे धरणातील पाणी शेती व पिण्यासाठी पुरणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भीमा खो-यातील धरणामधील पाणीसाठ्याची टक्केवारी पुढील प्रमाणे :- कळमोडी २४.०२,चासकमान ३८.०६ ,भामा आसखेड ५९.७६ , वडीवळे ६६.८०, आंद्रा ८१.४४, पवना ५४.१४ ,कासारसाई ५५.६० ,मुळशी ५२.३३ , टेमघर ०.८६,वरसगाव ५२.४९ ,पानशेत ५०.२५, खडकवासला ५६.२२, गुंजवणी ३८.८६, निरा देवधर ३८.२५, भाटघर ५०.८०,वीर ६३.६१,नाझरे ०.०,उजनी २२.९० पिंपळगाव जोगे २५.६५ , माणिकडोह १२.४९,येडगाव २९.३८,वडज २५.७६ ,डिंभे ३९.१०,घोड १२.९९, विसापूर ५.०८,