अगदी काही आठवड्यांपूर्वी सर्वाधिक कोरोना रुग्ण वाढी साठी ओळखल्या गेलेल्या पुणे शहरात रुग्ण संख्यां चांगलीच आटोक्यात आली आहे. याचाच थेट परिणाम म्हणजे पुणे शहरातील ,कंटेनमेंट झोनची संख्या फक्त २८ वर आली आहे. याबरोबरच पॉझिटीव्हिटी रेट ५.५१% वर आला आहे.
पालकमंत्री अजित पवार यांचा उपस्थिती मध्ये होणाऱ्या आढावा बैठकीसाठी महापालिकेकडून तयार करण्यात आलेल्या प्रेझेंटशन मधून ही दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. शहरात मायक्रो कंटेनमेंट झोनची संख्या काहीच महिन्यांपूर्वी १०० पेक्षा जास्त होती. आता मात्र ही अगदी कमी झालेली दिसत आहे. पाच पेक्षा जास्त रुग्ण असणाऱ्या भागाला कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येते. या भागातील नागरिकांचा वावरावर निर्बंध लादले जातात. सध्या पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये ६ इमारती,१० सोसायट्या, आणि इतर १२ असे केवळ २८ कंटेनमेंट झोन आहेत.
याबरोबरच दिलासादायक ठरलेली दुसरी महत्वाची बाब म्हणजे सध्या शहरात कोरोना चे ५२१३ रुग्ण आहेत. तर एकुण पॉझिटीव्हिटी रेट ५.५१% वर आला आहे. त्यामुळे शहराला काही दिलासा मिळतो का आणि आणखी अनलॉक ची परवानगी मिळते का ते पाहावे लागेल.