लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोविड प्रतिबंधक लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात जे आरोग्यसेवक लस घेऊ शकले नव्हते, अशांसह काही नवीन आरोग्यसेवकांसाठी मंगळवारी (दि. १९) लसीकरणाचा दुसरा टप्पा आयोजित केला होता. परंतु, या टप्प्यातही लसीकरणाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. पहिल्या टप्प्याच्या तुलनेत टक्केवारी २४ टक्क्यांनी घसरली असून, मंगळवारपर्यंत ३१ टक्के लसीकरण झाले. पहिल्या टप्प्यात ५५ टक्के लसीकरण झाले होते.
महापालिकेने शहरातील सहा केंद्रांवर लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी केली होती. त्याकरिता सहा केंद्रांची निवड केली होती. या टप्प्यातील लसीकरणासाठी ६९१ जणांची नावे निश्चित करण्यात आली होती. यातील २१३ जणांनीच लस घेतली. यातही पुरुषांपेक्षा महिलांचे प्रमाण अधिक आहे. पहिल्या टप्प्यात ८०० जणांपैकी ४३८ जणांनी लस टोचून घेतली होती.
पहिल्या टप्प्यात ज्या आरोग्य सेवकांना लस घेता आली नव्हती अशा सेवकांना दुसऱ्या टप्प्यात लस देण्यात येणार होती. यासोबतच आणखीही काही नावे निवडण्यात आली होती. त्यांच्याशी पालिकेच्या यंत्रणेमार्फत तसेच रुग्णालयांमधून संपर्क साधण्यात आला होता. तसेच संगणकीय यंत्रणेमार्फतही मेसेज पाठविण्यात आले होते. परंतु, आरोग्य सेवकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचे चित्र मंगळवारी पहायला मिळाले. आरोग्य सेवकांमध्ये लसीबाबत असलेल्या शंका, भीती, लस ऐच्छिक असल्याने त्याबाबतचे स्वातंत्र्य, लस घेण्याची गरज न वाटणे आदी कारणांमुळे लसीकरणाचा वेग मंदावला असल्याचे सांगितले जाते.
चौकट
रुग्णालय उद्दिष्ट प्रत्यक्ष लसीकरण
कै. जयाबाई सुतार प्रसूतिगृह, कोथरूड १०० २१
कमला नेहरू रुग्णालय, सोमवार पेठ (दोन केंद्र) २०० ७२
राजीव गांधी रुग्णालय, येरवडा १०० २६
ससून सर्वोचपचार रुग्णालय १०० ३७
रुबी हॉल क्लिनिक, नगर रस्ता ९१ ५७
एकूण ६९१ २१३
चौकट
लसीकरणातील प्रमाण
पुरुष - ७४
महिला - १३९