पुणे : वारकरी आणि विश्वस्त यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी केलेल्या सर्व मागण्या विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मंगळवारी अमान्य केल्या. तसेच स्वतंत्र लेखी आदेश काढत शासनाने निश्चित केलेल्या नियमानुसारच पालखी सोहळा आणि वारीला परवानगी दिली आहे.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पंधरा दिवसापूर्वी विश्वस्त आणि वारकरी प्रतिनिधी यांची बैठक घेतली होती. या बैठकीत शासनाने दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक लोकांना परवानगी द्यावी व पालखी प्रस्थान सोहळ्यात अश्वांना परवानगी देण्यावर सकारात्मक चर्चा झाली होती. परंतु शासनाने मंत्रिमंडळात चर्चा करून निर्णय घेतला असल्याने विभागीय आयुक्त यांनी शासनाच्या आदेशाच्या अधीन राहूनच लेखी आदेश काढले आहेत.
कोविड संसर्गाची दुसरी लाट अटोक्यात येत असतानाच केंद्रीय कृती गटाने तिसरी लाट येत्या काही दिवसांत येण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे खबरदारी घेत हे आदेश काढण्यात आले आहेत.
पंढरपुरात आषाढीदरम्यान संचारबंदीचा प्रस्ताव
आषाढी यात्रेदरम्यान १७ ते २५ जुलैपर्यंत शहर आणि परिसरातील १० गावांत संचारबंदीचा प्रस्ताव शासनाला देण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले. याबाबत जिल्हा प्रशासनाने दिलेल्या प्रस्तावाला शासनाने हिरवा कंदील दाखवला असून, लवकरच याबाबत सविस्तर आदेश निघण्याची शक्यता आहे. यात्रा काळात चंद्रभागेत स्नानासाठी भाविकांनी येऊ नये म्हणून परिसरात कलम १४४ लागू केले जाणार आहे.
- राज्यातील मानाच्या १० पालख्यांच्या सोहळ्यास परवानगी
- देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यांस प्रत्येकी १०० व अन्य आठ पालख्यांच्या सोहळ्यास प्रत्येकी ५० वारकऱ्यांना मान्यता
- सहभागी शंभर टक्के वारकऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक
- आषाढी वारीच्या प्रस्थान सोहळ्यानंतर पादुकांसोबत पंढरपूरकडे वारीसाठी विशेष वाहनाद्वारे प्रतिबस २० भाविक याप्रमाणे दोन बसमध्ये एकूण ४० वारकऱ्यांना परवानगी
- श्री संतांच्या पादुका विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तेथून पुढे १.५ कि.मी. अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायी वारी करण्यास शासन मान्यता.