पुणे : टंचाई काळात देण्यात येणारा शेततळ्यांचा लाभ जिल्ह्यातील ४१४ गावांना होऊ शकतो. कारण, या गावांत गेल्या ५ वर्षांत एक वर्ष तरी ५० पैसे पेक्षा कमी पैसेवारी जाहीर झाली आहे. राज्यात दुष्काळाचे चित्र दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पाण्याबरोबर चाराटंचाईची तीव्रता वाढत आहे. पुणे जिल्ह्यातही टँकरने पन्नाशी फेबु्रवारीच्या पहिल्या आठवड्यातच पार केली आहे. केंद्र सरकारने या अर्थसंकल्पात ‘मागेल त्याला शेततळे’ घोषणा केली आहे. यातून जिल्ह्यात १,२७३ शेततळ्यांचे उद्दिष्ट मिळाले आहे. मागेल त्याला असे जरी शासनाने म्हटले असले, तरी काही निकष व अटी घातल्या आहेत.यात मागील ५ वर्षांत एक वर्ष तरी ५0 पैैशांपेक्षा कमी पैसेवारी असावी, दारिद्र्यरेषेखाली असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य, कमीत कमी ०.६० हेक्टर जमीन असावी तसेच निवडलेली जमीन तांत्रिकदृष्ट्या पात्र असावी हे निकष आहेत. इतर निकष जरी योग्य असले, तरी ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी या निकषात जिल्ह्यातील १,४०४ गावांपैकी फक्त ४१४ गावे बसत असून, त्यांनाच याचा लाभ मिळू शकतो. वेल्हे व मुळशी या तालुक्यांतील एकही गाव या निकषात बसत नासल्याचे दिसून येते़मावळ तालुक्यातील फक्त एका गावाचा समावेश असून, भोर तालुक्यातील ५ गावांचा समावेश आहे. सर्वांत जास्त पुरंदर तालुक्यातील ९६ गावे असून, त्याखालोखाल शिरूर ८३, बारामती ६७, आंबेगाव ५५, इंदापूर ३४, दौैंड २२, खेड १८, जुन्नर १७, हवेलीतील १६ गावांना याचा लाभ मिळू शकतो.भोर, वेल्हे, मुळशी यांवर अन्यायभोर, वेल्हे व मुळशी या तालुक्यांतील पश्चिम पट्टा हा पर्जन्यछायेचा प्रदेश. या भागात पडणाऱ्या पावसाचे पाणी येथील धरणांत अडविले जाते; मात्र त्याचा लाभ इतर तालुक्यांना होतो. शेतीसाठी म्हणून या पाणलोट क्षेत्रात या पाण्याचा व पावसाचा काहीही उपयोग होत नाही. भात हे एकच पीक; तेही फक्त खाण्यापुरते येथे घेतले जाते. तरीही येथील गावे ५० पैैसेवारीच्या अटीत बसत नाहीत. या भागात फळझाडे, दुबार पीक घेण्यासाठी शेततळी, बंधारे, बुडीत बंधारे घेण्याची गरज आहे. मात्र, शासन हे निकष समोर करून आमच्यावर नेहमीच अन्याय करीत असल्याची भावना येथील शेतकऱ्यांमध्ये आहे.
शेततळ्यांचा ४१४ गावांनाच लाभ
By admin | Published: March 11, 2016 1:50 AM