पुणे : कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयातील एटीएम स्वीच (सर्व्हर)वर सायबर हल्ला करून, ९४ कोटी ४२ लाख रुपये लुटल्याप्रकरणात न्यायालयाने ११ आरोपींना शिक्षा सुनावली. मात्र, यातील परदेशातील प्रमुख सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यात अद्यापही यश आले नाही. भारतातील क्लोन रुपे डेबिट कार्डाच्या मास्टर माईंडला दुबईहून भारतात आणण्यात गेल्या दोन वर्षांत यश आलेले नाही. सायबर चोरट्यांनी लांबविलेल्या ९४ कोटी रुपयांपैकी केवळ ६ कोटी रुपये परत मिळविण्यात यश आले आहे.
परदेशात व्हिसा कार्ड, तर भारतात क्लोन रुपे डेबिट कार्डद्वारे सुमारे अडीच कोटी रुपये काढण्यात आले. ही क्लोन कार्ड तयार करून ती वेगवेगळ्या शहरात पोहोचविणे, आपल्या साथीदारांमार्फत एटीएममधून पैसे काढून घेण्याचे काम सुमेर शेख याने घडवून आणले होते. त्याची पत्नी व नातेवाईकांना पुणे पोलिसांनी पकडले. याचे सर्व धागेदोरे शोधून काढले. सुमेर शेखचा हात उघडकीस आणला. इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावल्यानंतर सुमेर शेख याला दोन वर्षांपूर्वी यूएई पोलिसांनी अटक केली. मात्र, त्यानंतर प्रत्यार्पणाबाबत पाठपुरावा होऊ न शकल्याने आजही त्याला भारतात आणण्यात यश आले नाही.
हॅंनसॅंग बँकेतील एएलएम ट्रेडिंग लिमिटेड या खात्यावर १३ कोटी ९३ लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. सायबर पोलिसांच्या प्रयत्नांनंतर १० कोटी रुपये गोठवण्यात आले होते. हाँगकाँगमधील न्यायालयात सुनावणी होऊन त्यातील कॉसमॉस बँकेच्या खात्यात ५ कोटी ७३ लाख रुपये पैसे जमा झाले आहेत.
परदेशातील सायबर चोरट्यांविषयी माहिती, सीसीटीव्ही फुटेज पुणे पोलिसांनी सीबीआय, परराष्ट्र मंत्रालयामार्फत त्या त्या देशांना पाठविली. आरोपींचा शोध घेण्याची विनंती केली. परंतु, त्या देशांनी प्रयत्न केले नाही. त्यामुळे यातील मुख्य सूत्रधार अजूनही हाती लागू शकले नाही. केवळ एटीएममधून पैसे काढणारे काही जणांना पकडण्यात यश आले. त्यांना शिक्षा सुनावली गेली. हेच काय ते समाधान.
समाधानकारक तपास
काॅसमॉस बँकेवरील सायबर हल्ल्याचा पुणे पोलिसांनी केलेला तपास समाधानकारक आहे. हाँगकाँगमधील हँगसँग बँकेत ट्रान्सफर झालेल्या पैशांपैकी ६ कोटी रुपये परत मिळाले आहेत. या सायबर हल्ल्याची दखल घेऊन रिझर्व्ह बँकेने अनेक सुरक्षाविषयक पावले उचलली. त्यामुळे देशभरातील बँकांमधील सायबर सुरक्षेत वाढ झाली.
मिलिंद काळे, अध्यक्ष कॉसमॉस बँक.