पुणे : शहरात तब्बल अडीच महिन्यानंतर कोरोनाबाधितांची दैनंदिन वाढ सातशेच्या आत आली असून, सोमवारी दिवसभरात केवळ ६८४ जण नवे रूग्ण आढळून आले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरात २ मार्च रोजी प्रथमच सर्वाधित म्हणजे ६८८ कोरोनाबाधित एकाच दिवशी आढळून आले होते. तद्नंतर हजार, दीड, दोन हजारांच्या पुढे दररोज वाढत जाणारी ही कोरोनाबाधितांची संख्या आज प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात खाली आली आहे.
शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी तपासण्यांचे प्रमाण हे दहा हजारांच्या पुढे असतानाही, सोमवारी ( दि १७) तपासण्यांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. आज दिवसभरात ८ हजार ८६२ जणांनी तपासणी करून घेतली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ८.७० टक्के इतकी आहे़ १२ ते १५ टक्क्यापर्यंत असलेली कोरोनाबाधितांची रोजची टक्केवारीही, गेल्या अडीच महिन्यात प्रथमच दहा टक्क्यांच्या आत आली आहे. तर शहरातील सक्रिय रूग्ण संख्याही वीस हजाराच्या आत आली असून, आजमितीला शहरात १८ हजार ४४० सक्रिय रूग्ण आहेत. आज दिवसभरात २ हजार ७९० जण कोरोनामुक्त झाले आहेत.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात ६६ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २३ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १़६८ टक्के आहे.
शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ५ हजार २८७ कोरोनाबाधित रूग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत असून, १ हजार ४०२ रूग्ण हे गंभीर आहेत. शहरात आत्तापर्यंत २३ लाख ७२ हजार ३४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ५९ हजार ९८७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ३३ हजार ७९८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत शहरात ७ हजार ७४९ जणांचा मृत्यू झाला आहे.
-----------