पुणे : शहरातील केवळ ७५ गतिरोधक हे इंडियन रेड काँग्रेसच्या (आयआरसी) निकषानुसार बनविण्यात आले आहेत, अशी स्पष्ट कबुली महापालिका प्रशासनाच्या वतीने माहिती अधिकारांतर्गत दिली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालिकेकडून पालन झाले नसल्याचे स्पष्ट होत असून, याविरुद्ध न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल करण्यात येणार आहे.शहरामध्ये ५०० पेक्षा जास्त गतिरोधक महापालिकेकडून बसविण्यात आले आहेत. या गतिरोधकांची अवस्था अत्यंत वाईट असल्याने वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी अनेकदा महापालिकेकडे दाखल झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेने शहरात आयआरसीच्या नियमानुसार किती गतिरोधक उभारले आहेत, याची माहिती लोकहित फाउंडेशनचे अजहर खान यांनी ३० जुलै २०१५ मध्ये मागितली. पालिकेने सुरुवातीला अशी माहिती उपलब्ध नसल्याचे उत्तर दिले होते. त्यावर त्यांनी यावर अपील दाखल केले. त्यानंतर मात्र पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील सर्व गतिरोधकांची तपासणी करून त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ६, कोंढवा-वानवडी १९, बिबवेवाडी २४, कोथरूड ११, घोले रोड १५ असे एकूण ७५ गतिरोधकच आयआरसी नियमानुसार बनविण्यात आले आहेत. सर्व गतिरोधकांची दुरुस्ती करून आयआरसीच्या नियमानुसार बनविण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी दिले होते. त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही. प्रत्येक गतिरोधकाच्या ४० मीटर अलीकडे पुढे गतिरोधक असल्याचा बोर्ड पाहिजे. मुख्य रस्त्यावर शक्यतो गतिरोधक बसविण्यात येऊ नयेत, असे निकष ठरवून दिले आहेत. मात्र, पालिकेच्या दाव्यानुसार प्रत्यक्षात ७० गतिरोधक हे आयआरसीप्रमाणे आहेत. त्यामुळे उर्वरित साडेचारशे गतिरोधकांची उभारणी ही अशास्त्रीय पद्धतीने झाली असल्याचे स्पष्ट होत आहे. ‘सजग नागरिक मंच’च्या वतीने शहरातील गतिरोधक आयआरसीच्या नियमानुसार असावेत, याकरिता मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला गेला. न्यायालयाने दिलेला आदेशही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, तरीही पालिकेकडून अद्याप अशास्त्रीय पद्धतीनेच गतिरोधक उभारले जात आहेत. सिग्नलला गतिरोधक बसविले जाऊ नये, असा स्पष्ट नियम असताना सिग्नललाही अनेक ठिकाणी गतिरोधक उभारण्यात आले आहेत. उच्च न्यायालयामध्ये अवमान याचिकाशहरातील केवळ ७५ गतिरोधक आयआरसीच्या नियमानुसार झाले असल्याची अधिकृत माहिती पालिकेने दिली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महापालिकेविरुद्ध उच्च न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल करणार असल्याचे लिगल राइट सोसायटीचे अध्यक्ष अनुप अवस्थी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पालिकेसमोरच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे. >> ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ६, कोंढवा-वानवडी १९, बिबवेवाडी २४, कोथरूड ११, घोले रोड १५ असे एकूण ७५ गतिरोधकच आयआरसी नियमानुसार आहेत.
केवळ ७५ गतिरोधक नियमानुसार
By admin | Published: October 19, 2015 2:06 AM