रविकिरण सासवडे बारामती : डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून नेहमी वेगवेगळ्या योजना राबवण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर मागील दोन महिन्यांपासून इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून ‘आधार सक्षम पेमेंट सिस्टिम’ (एईपीएस) सुरू करण्यात आली आहे. केवळ आधार क्रमांकाच्या माध्यमातून सुरक्षित आर्थिक व्यवहार करता येत आहेत. बारामती मुख्य टपाल केंद्रातील इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून आतापर्यंत ५०० एईपीएस व्यवहारांमधून २० लाखांपर्यंतचे व्यवहार झाले आहेत. बारामती मुख्य पोस्ट कार्यालयामध्ये मागील वर्षी इंडियन पोस्ट पेमेंट बँक सुरू करण्यात आली. ‘आपली बँक आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत बारामती मुख्य पोस्ट कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, शिरूर आदी तालुक्यांमध्ये २२० टपाल कार्यालयांमधून काम सुरू झाले. वर्षभरानंतर या बँकेचे २० हजारांपर्यंत सभासद झाले आहेत. डिजिटल व्यवहार अधिक सुलभ होण्यासाठी आधार सक्षम पेमेंट सिस्टिम सुरू करण्यात आली. या माध्यमातून जे आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न असेल अशा बँक खात्यांमधून केवळ आधारकार्डच्या क्रमांकावरून विनामूल्य व्यवहार करणे शक्य होत आहे. एईपीएस व्यवहारांची मर्यादा १० हजारांपर्यंत असणार आहे. आधार सक्षम पेमेंट सिस्टिमला कोणतेही कागद किंवा कार्ड लागत नसले तरी त्या व्यक्तीला आधार बँक खात्याशी जोडणे आवश्यक आहे. जर व्यक्ती आपला आधार लिंक करण्यास अयशस्वी ठरली तर संबंधित व्यक्ती एईपीएस सुविधा वापरू शकणार नाही. ........जास्तीत जास्त लोकांनी एईपीएस प्रणालीचा लाभ घ्यावा. सुरक्षित डिजिटल व्यवहारांसाठी शासनाच्या वतीने ही विनामूल्य सुविधा देण्यात आली आहे. बारामतीमधील वेगवेगळ्या अॅक्सिस पॉइंटवर १० फेब्रुवारी रोजी मेगा लॉगिंग डे ठेवण्यात आला आहे. या माध्यमातून आम्ही एईपीएसच्या माध्यमातू जास्तीत जास्त व्यवहार करण्याचा प्रयत्न करणार आहोत.- अमेय निमसुडकर,मुख्य पोस्ट मास्तरबारामती मुख्य टपाल कार्यालय, बारामती ............खातेदार बँकिंग प्रतिनिधीच्या मदतीने आर्थिक व्यवहार करू शकतात.आपल्या डेबिट कार्डवर स्वाक्षरीची आवश्यकता नाही.पूर्णपणे सुरक्षित प्रक्रिया आहे कारण एईपीएस व्यवहारांना खातेधारकाच्या फिंगरप्रिंटची आवश्यकता असते.तंत्रज्ञानाची माहिती नसलेल्या व्यक्तींसाठी ही प्रक्रिया सुलभ आहे.इंडियन पोस्ट पेमेंटच्या माध्यमातून गावागावांमधील पोस्टमनकडे आता पीओएस मशीन. त्यामुळे दुर्गम भागातील व्यक्तीसुद्धा बँकेत न जाता आर्थिक व्यवहार करू शकते. मागील काळात आधारकार्ड काढणाºया देशातील प्रत्येक व्यक्तीचा बायोमेट्रिक डेटा संकलित करण्यात आला आहे. त्यामध्ये बोटांचे ठसे, आणि डोळ्यांच्या प्रतिमांचादेखील समावेश करण्यात आला. गोळा केलेला बायोमेट्रिक डेटा प्रत्येक व्यक्तीबाबत वेगळा आहे. म्हणूनच बँकिंग व्यवहारांसाठी पुरावा म्हणून आधार काम करते. त्यामुळेच एईपीएस प्रणालीसाठी आधारचा उपयोग करण्यात आला आहे.
केवळ आधार क्रमांकावर सुरू झाली आर्थिक देवाण-घेवाण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2020 2:01 PM
आतापर्यंत ५०० एईपीएस व्यवहारांमधून २० लाखांपर्यंतचे व्यवहार
ठळक मुद्देआधार सक्षम पेमेंट सिस्टिम : डिजिटल व्यवहारांना चालना बारामती मुख्य पोस्ट कार्यालयामध्ये मागील वर्षी इंडियन पोस्ट पेमेंट बँक सुरू बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, शिरूर आदी तालुक्यांमध्ये २२० टपाल कार्यालयांमधून काम सुरूवर्षभरानंतर या बँकेचे २० हजारांपर्यंत सभासद