लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अभियांत्रिकी व फार्मसी अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. येत्या आठवड्याभरात ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिध्द केले जाण्याची शक्यता आहे. तसेच बारावीच्या वाढलेल्या निकालाचा व कोरोनाचा अभियांत्रिकी प्रवेशावर परिणाम होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, तरी ऑनलाईन प्रवेश नोंदणी अर्ज ऑप्शन फार्म (पसंतीक्रम) भरल्यानंतरच विद्यार्थ्यांचा अभियांत्रिकी प्रवेशाचा कल समजू शकेल, असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
राज्य सामाजिक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्र शिक्षण विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक अद्याप प्रसिध्द झाले नाही. तसेच कोरोनामुळे ऑनलाईन वर्ग होणार की ऑफलाईन याबाबत विद्यार्थी व पालकांच्या मनात संभ्रमाचे वातावरण आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर म्हणाले, बारावीच्या निकालावर अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अवलंबून असते. यंदा बारावीचा निकाल चांगलाच वाढला असून कला, वाणिज्य, विज्ञान या पारंपरिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच कोरोनामुळे बाहेरगावी जाऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. परिणामी अभियांत्रिकी अभ्यासक्रमास चांगला प्रतिसाद मिळेल. मागील वर्षी प्रवेश क्षमतेच्या केवळ ४८ टक्के जागांवर प्रवेश झाले होते. यंदा सुमारे ६० ते ७० टक्क्यांपर्यंत प्रवेश वाढण्याची शक्यता आहे.
--
विद्यार्थी अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यास इच्छुक असतात. मात्र, त्यांना आवडीची शाखा किंवा महाविद्यालय मिळाले नाही तर ते बीसीएस किंवा बीबीए सारख्या अभ्यासक्रमांचा पर्याय निवडतात. मात्र, विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेशासाठी नोंदणी करून ऑप्शन फॉर्म भरल्यानंतरच प्रवेशाचा कल समजू शकेल.
- बी. बी. आहुजा, संचालक, सीओईपी
---
विद्यार्थी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, प्रवेश नोंदणी आणि ऑनलाईन ऑप्शन फार्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येवरूनच प्रवेशाचा कल लक्षात येईल.
- डॉ. गजानन खराटे, माजी अधिष्ठाता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ