पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या द्वितीय सत्राच्या परीक्षांचे अर्ज भरण्यास २७ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे या सत्राच्या परीक्षा १५ जुलैनंतरच घ्याव्या लागणार आहेत, असे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमधील संलग्न महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा जून महिनाअखेरीस घेण्याचा विद्यापीठाचा विचार होता. परंतु, परीक्षा अर्ज भरण्यासाठी विद्यापीठाकडे वारंवार मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे सुमारे चार ते पाच दिवस विद्यापीठाचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरता आला नाही. त्यामुळेसुद्धा विद्यापीठाने येत्या २८ जूनपर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली. ही मुदतवाढ ३० जूनपर्यंत वाढवली जाऊ शकते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करावे लागत आहे. विद्यापीठाशी संलग्न काही महाविद्यालयांचा द्वितीय सत्राचा अभ्यासक्रम पूर्ण शिकवून झाला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे सयुक्तिक झाले नसते. कला, वाणिज्य आणि विज्ञान हा विद्याशाखांचा अभ्यासक्रम झाला आहे. परंतु अभियांत्रिकी फार्मसी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांचा अभ्यासक्रम अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यामुळे परीक्षा 15 जुलैनंतरच घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे, असेही परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
----------------
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा लांबल्यामुळे परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे. त्यामुळे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा लवकरात लवकर घ्याव्यात, अशी मागणी विविध विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे.मात्र, विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी करण्यास काही दिवसांचा कालावधी लागणार आहे. उशिरापर्यंत अर्ज स्वीकारल्यामुळे आपोआपच परीक्षा काही दिवसांनंतर घ्यावी लागणार आहे.