पुणे - पंतप्रधान मोदींना विरोधासाठी विरोध करणे हा विरोधकांचा एकमेव अजेंडा आहे. याखेरीज त्यांच्याकडे बोलण्यासारखे काही उरले नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केली. कसबा विधानसभा मतदार संघ आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्या वतीने महायुतीचा महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. आरपीआयच्या राष्ट्रीय नेत्या सीमा आठवले, महापौर मुक्ताताई टिळक, भाजपच्या महिला शहर प्रमुख शशिकला मेंगडे, स्वरदा बापट, शिवसेनेच्या नेत्या तृष्णा विश्वासराव , वैशाली नाईक , संगीता आठवले , त्याचप्रमाणे भाजप , शिवसेना,आरपीआय आणि अन्य घटक पक्षाच्या महिला पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होत्या. मेळाव्यास महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. विरोधकांकडे धोरण नाही आणि नेता नाही असे स्पष्ट करून रहाटकर म्हणाल्या, जनतेसमोर मांडण्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही मुद्दे नाहीत. त्यांचा विरोध केवळ विरोधासाठी आहे. विकासाचा कोणताही कार्यक्रम नाही. म्हणूनच देशाच्या विकासासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार हवे आहे. हे सरकार सक्षम आणि मजबूत असावे यासाठी बहुमताने सरकारला निवडून द्या केवळ पुण्यात नाही तर राज्यात आणि देशात जास्तीतजास्त जागा आपणास मिळाल्या पाहिजेत यासाठी प्रयन्त करा. महिलांसाठी सरकारने अनेकविध योजना आणल्या. त्याची माहिती घरोघरी पोचवा, असे त्या म्हणाल्या. आरपीआय नेत्या आठवले म्हणाल्या, समाजातील गरीब, शेतकरी, कष्टकरी, अशा विविध घटकासाठी सरकारने योजना आणल्या आहेत त्याची माहिती महिलांनी स्वत: करून घ्यावी आणि इतरांना सांगावी. राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या फरकाने निवडून आणा. महापौर टिळक यांनी सांगितले की , गेल्या पाच वर्षात मोदी सरकारने केवळ महिला सक्षमीकरणासाठी योजना आणल्या नाहीत तर जगात देशाची प्रतिष्ठा उंचावली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सरकारला आपणाला संधी द्यायची आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोधासाठी विरोध हाच एकमेव अजेंडा : विजया रहाटकर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 12:37 PM