"फक्त बारामती, बारामती करायला मी येथे आलाे नाही, स्वार्थासाठी तुम्हाला बोलावलेले नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 11:00 AM2024-03-28T11:00:12+5:302024-03-28T11:00:41+5:30
बारामती लोकसभा मतदारसंघातील नामांकित वस्ताद आणि कुस्तीगीरांचा स्नेहमेळावा राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पार पडला...
पुणे : फक्त बारामती, बारामती करायला मी येथे आलेलो नाही, की स्वार्थासाठी तुम्हाला बोलावलेले नाही. शिरूर, मावळ, पुणे आणि बारामती अशा चारही मतदारसंघांत पहिलवानांची मदत महायुतीला हवी आहे. काही लोक तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न करतील, फोन करतील. पण त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवाहन केले. खेळात वाद नको. त्यामुळे महाराष्ट्र केसरीतील वाद मिटवावा असं मला वाटतंय, असेही ते म्हणाले.
बारामती लोकसभा मतदारसंघातील नामांकित वस्ताद आणि कुस्तीगीरांचा स्नेहमेळावा राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर, बाबा कंधारे, पंकज हरकुडे, अप्पा रेणुसे, दत्ता सागरे आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, पुणे जिल्ह्याच्या अनेक भागांतून पहिलवान आले आहेत. त्या सर्वांचे मी स्वागत करतो. शिरूर, पुणे, बारामती, मावळ यासह ज्या ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार असणार आहेत, त्या सर्वांना सहकार्य करा, तुम्ही आशीर्वाद द्या, आम्ही तुम्हाला निश्चित सहकार्य करू. कोणत्याही खेळाडूला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. जसा कोल्हापूरच्या तालीम संघाचा विकास आराखडा आहे, तसा आराखडा तयार करण्यात येईल. पुणे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ तात्पुरत्या स्वरूपात कुलगुरूंची नेमणूक केलेली आहे, असे पवार यांनी सांगितले.
............
देशाची राज्यघटना बदलतील असं काहीही होणार नाही :
लोकशाहीत कुणी कुणाचं काम करायचं तो ज्याचा त्याचा अधिकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आज पुढे जात आहे. मात्र, काही लोक गैरसमज पसरवत आहेत, की जर २०२४ मध्ये मोदी सरकार आले तर ते देशाची राज्यघटना बदलतील. पण तसं काहीही होणार नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या मोदींवरील टीकेला प्रत्युत्तर दिले.
----