महिलांना धमक्या भाजपच देऊ शकते; महाडिक यांच्या प्रकरणावरून डॉ. शमा मोहंमद यांची टीका
By राजू इनामदार | Updated: November 11, 2024 18:59 IST2024-11-11T18:59:08+5:302024-11-11T18:59:55+5:30
महायुतीची योजना हा निवडणुकीत मते मिळवण्यासाठी जाहीर केलेली व दीर्घकाळ न चालणारी अशी योजना

महिलांना धमक्या भाजपच देऊ शकते; महाडिक यांच्या प्रकरणावरून डॉ. शमा मोहंमद यांची टीका
पुणे: कोल्हापुरातील भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीणचे पैसे घेऊन काँग्रेसच्या सभेला येणाऱ्या महिलांचे फोटो काढून त्यांना पाहून घ्यायची धमकी दिली. महिलांना अशा प्रकारच्या धमक्या भाजपच देऊ शकते अशी टीका काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा मोहंमद यांनी केली. काँग्रेसने निवडणुकीसाठी जाहीर केलेली पंचसूत्रीच राज्यात चालेल असा दावा त्यांनी केला.
काँग्रेस भवनमध्ये डॉ. मोहंमद यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यावेळी उपस्थित होते. डॉ. शमा म्हणाल्या, “काँग्रेसने कर्नाटक, तेलंगणा या राज्यांमध्ये महिलांना दरमहा मानधन ही योजना यशस्वीपणे राबवली. तीच योजना महायुतीने ऐन निवडणुकीच्या तोंडावर इथे जाहीर केली. आम्ही दिलेली योजना ही दीर्घकाळ चालणारी योजना आहे. महायुतीची योजना हा निवडणुकीत मते मिळवण्यासाठी जाहीर केलेली व दीर्घकाळ न चालणारी अशी योजना आहे. त्यामुळे राज्यात या योजनेचा प्रभाव पडेल असे कुठेही दिसत नाही.”
त्याऐवजी आम्ही जाहीरनाम्यात नमूद केलेली पंचसूत्री हे जनतेला दिलेले वचन आहे. कोणत्याही राज्यामध्ये आम्ही जाहीर केले व ते केले नाही हा भाजप करत असलेला खोटा प्रचार आहे. आम्ही सांगितले व ते केले नाही अशी एखादी तरी गोष्ट त्यांनी दाखवावीच असे आव्हानही यावेळी डॉ. शमा यांनी दिले. महिलांसाठी आम्ही जाहीर केलेली महालक्ष्मी योजना त्यांना दरमहा ३ हजार रुपये देणारी आहे. ती जाहीर करताना महिलांना मदत करण्याची भूमिका आहे तर त्यांनी सादर केलेली मतांची खरेदी करण्यासाठी आहे. असे डॉ. मोहमंद म्हणाले.