खोडद : खरं तर हल्लीच्या काळात लग्नसोहळा म्हटलं की मानपान, सन्मान, सत्कार, नारळ, टॉवेलटोपी असा प्रकार सर्रासपणे पाहायला मिळतो. नव्हे, तर हा प्रकार कार्यमालकास करावाच लागतो, अगदी मनाविरुद्ध केवळ समाजाच्या चालीरीती जपत, कोणीही नावठेवू नये म्हणून ! मात्र, या सगळ्या गोष्टींना फाटा देत आपल्या घरातील लग्नसोहळ्यात सर्व उपस्थित मान्यवरांना करिअर अंकाचे वाटप करून समाजात एक आगळावेगळा पायंडा खोडद येथील डोंगरे आणि मांजरवाडी येथील मुळे कुटुंबीयांनी पाडला आहे.
सगळ्याच लग्नसोहळ्यात गंध लावणे,मानपान ,आहेर,वरात आदी बाबींवर प्रचंड खर्च केला जातो. अशा परिस्थितीमध्ये डोंगरे व मुळे परिवाराने त्यांच्या विवाह सोहळ्यात करिअर विशेषांक भेट देऊन विवाहास आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला. हा उपक्रम आगळावेगळा आणि विधायक असून तो सर्वांसाठी पथदर्शी आहे, असे गौरवोद्गार जयहिंद पतसंस्थेचे अध्यक्ष गुलाब नेहरकर यांनी काढले.गीतांजली व मच्छिंद्र दत्तात्रय डोंगरे यांचे सुपूत्र भाग्येश आणि विमल व अशोक तुकाराम मुळे यांची सुकन्या प्रितम यांच्या शुभ विवाहप्रित्यर्थ करिअर विशेषांकाचे प्रकाशन मांजरवाडी येथे करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा बँकेच्या माजी संचालिका राजश्री बोरकर, मांजरवाडीचे सरपंच सूर्यकांत थोरात, चेअरमन डी. आर.थोरात, खोडदचे माजी सरपंच विजय थोरात, जालिंदर डोंगरे , वधू वराचे आई वडील आदी मान्यवरांच्या हस्ते या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर लगेचच विवाहास आलेल्या सर्व पाहुणे मंडळींना सदर विशेषांक भेट म्हणून देण्यात आला. वधू वरास शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेल्या मान्यवरांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी ह.भ.प. राजाराम महाराज जाधव, खोडदचे माजी उपसरपंच शिवाजी खरमाळे, भाऊसाहेब जाधव, शिवसेना तालूका प्रमुख माऊली खंडागळे आदी मान्यवरांनी वधू वरास शुभेच्छा दिल्या.मुख्यमंत्र्यांसह अनेक माननीयांकडून कौतुक४उपक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, अन्नपुरवठा मंत्री गिरीश बापट, शिरूरचे खासदार शिवाजी आढळराव पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, शिवांजली साहित्य पिठाचे अध्यक्ष कवी शिवाजी चाळक यांनी कौतुक करुन शुभसंदेश दिले आहेत.