पुणे : गर्दीच्या वेळी कमी प्रमाणात आणि दिवसभर रिकाम्या धावणाऱ्या बसचे चित्र शहरात सातत्याने दिसते. या पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) केवळ गर्दीच्या वेळी अधिकाधिक बस प्राधान्याने मार्गावर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात अकरा मार्गांवर सकाळी ८ ते १२ आणि सायंकाळी ५ ते ९ या वेळेत ही शटल सेवा सुरू करण्यात आली आहे. या वेळेत एका मार्गावर ४ ते ५ बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पीएमपीचे सुमारे ३५० हून अधिक मार्ग आहेत. त्यातील अनेक मार्ग तोट्यात आहेत. प्रामुख्याने सकाळी व सायंकाळी बसला प्रचंड गर्दी असते. पण बंद बस, ब्रेकडाऊन यामुळे या वेळेत प्रवाशांना पुरेशा बस उपलब्ध होत नाहीत. याउलट दुपारी गर्दी नसतानाही बस रिकाम्या मार्गावर धावतात. त्यामुळे तोट्यात भर पडत आहे. हा तोटा कमी करण्यासाठी तसेच गर्दीच्या वेळी प्रवाशांना पुरेशा बस उपलब्ध व्हाव्यात यासाठी पुन्हा ‘ब्रोकन’ प्रणाली सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत सकाळी व सायंकाळीच बस मार्गावर धावतात. काही महिन्यांपूर्वी ही प्रणाली बंद करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यामध्ये एकूण ११ मार्ग सुरू करण्यात आले आहेत. ही शटल सेवा असून प्रत्येक मार्गावर ४ ते ५ बस धावणार आहेत. त्यासाठी तोट्यातील काही फेऱ्या रद्द होतील.........स्वारगेट, डेक्कन, पुणे स्टेशन, मनपा या गर्दीच्या ठिकाणांना प्राधान्य देण्यात आले आहे. प्रत्येक बसला प्रतिदिन १० हजार रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. या बस मार्गस्थ होण्यासाठी डेपोकडून प्रथम प्राधान्यक्रम ठरविण्यात आलेला आहे. दुपारच्या वेळी या बसचे देखभाल-दुरूस्तीही करता येणार आहे. त्यामुळे ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी होईल. सर्व मार्गावर एकत्रितपणे ५० वाहक व ५० चालकांची बचत होणार आहे. तसेच इंधनाचीही बचत होईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.............ब्रोकन प्रणालीमुळे गर्दीच्या वेळी मार्गावर बस सोडणे शक्य होते. त्यामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांना बस उपलब्ध होते. दुपारच्या सत्रात बसची देखभाल-दुरूस्ती करणे शक्य आहे. या प्रणालीमुळे इंधन खर्चात बचत होऊन उत्पन्नही चांगले मिळते. - अनंत वाघमारे, प्रभारी वाहतुक व्यवस्थापक, पीएमपी
..........
बसच्या वेळा सकाळी- ८ते १२ सायंकाळी- ५ ते९ ........
पहिल्या टप्प्यात सुरू झालेले ११ मार्ग १. स्वारगेट ते कात्रज २. स्वारगेट ते अप्पर३. स्वारगेट ते हडपसर४. स्वारगेट ते धायरी५. डेक्कन ते माळवाडी६. डेक्कन ते कोथरूड आगार७. पुणे स्टेशन ते हडपसर८. पुणे स्टेशन ते वाघोली९. पुणे स्टेशन ते विश्रांतवाडी१०. अप्पा बळवंत चौक ते सांगवी११. मनपा ते बालेवाडी