अतुल चिंचली
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अतिशय प्रसन्न भाव, खांद्यावर रुळणारे केस, आशिर्वाद देणारा हात या रुपातील संत ज्ञानेश्वरांची नितांतसुंदर मूर्ती महात्मा फुले मंडई परिसरातील नाना महाराज साखरे मठ येथे पाहण्यास मिळते. ७२४ वा संत ज्ञानेश्वरी माऊली संजिवन समाधी सोहळा शनिवारपासून (दि. १२) सुरु होत आहे.
या निमित्ताने ज्ञानेशाच्या या एकमेव जुन्या मुर्तीला सजवण्यात येत आहे. साखरे मठाला संत ज्ञानेश्वरी वाचन मंदिरही म्हटले जाते. ज्ञानेश्वरीचे अभ्यासक नाना महाराज साखरे हे या मंदिरात ज्ञानेश्वरीवर प्रवचन देत असत. १९०३ साली नाना महाराज साखरे यांनी संन्यास घेतला. त्यानंतर त्यांचा मुलगा पुरुषोत्तम नारायण जोशी यांनी १९२७ मध्ये मठाचा जीर्णोद्धार केला.
त्यांनी १९२८ मध्ये याच ठिकाणी पांडुरंग-रुक्मिणी मूर्तीची स्थापना केली. तर १९४७ मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीची स्थापना केली. पुरुषोत्तम जोशी यांनी संन्यास घेतल्यावर त्यांना ‘कृष्णानंद सरस्वती स्वामी’ नावाने ओळखू लागले. सुमारे ७४ वर्षे पूर्ण झालेल्या या ज्ञानेश्वर मूर्तीची सुबकता आजही टिकून आहे. या मठात नियमितपणे ज्ञानेश्वरी जयंती, रामनवमी, गोकुळाष्टमी असे उत्सव साजरे केले जातात. ज्ञानेश्वरी प्रवचन, पारायण सप्ताह हे कार्यक्रमही होतात.
चौकट
साईबाबांची मूर्ती घडवणारे हात हेच
“संत ज्ञानेश्वरांची संगमरवरी मूर्ती असणारे हे पुण्यातील एकमेव मंदिर आहे. ही मूर्ती प्रसिद्ध शिल्पकार बी. व्ही तालीम यांनी घडवली. याच तालीम यांनी पुढे शिर्डीतील साईबाबांची मूर्तीही घडवली आहे,” अशी माहिती मंदिराचे विश्वस्त विनायक मोडक यांनी दिली. मठात पांडुरंग रुक्मिणीच्या पुढे संत ज्ञानेश्वरांची बैठ्या अवस्थेतील ही मूर्ती आहे.
चौकट
“ज्ञानेश्वरांची ही मूर्ती बी. व्ही. तालीम यांनी घडवलेल्या संगमरवरातील सर्वोत्तम कलाकृतींपैकी एक महत्वाची कलाकृती आहे. मूर्तीच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता अजूनही झळकते. एक देखणे शिल्प म्हणून तिची ओळख आहे. तालीम यांनी मूर्ती घडवताना घेतलेले कष्ट मूर्ती पाहताना जाणवतात.”
-मिलिंद सबनीस, चित्रकार