लोकमत न्यूज नेटवर्कवेल्हे : तालुक्यातील तोरणा किल्ल्यालगतच्या पश्चिमेकडील अतिदुर्गम डोंगररांगेत असलेल्या भट्टी घाटातील दरीत रविवारी रात्री कार कोसळली. सुदैवाने कारमधील दोघे वाचले. केवळ दैव बलवत्तर होते म्हणून त्यांना गाडी दरीत कोसळली तरी साधे खरचटलेदेखील नाही.घाटातून रात्रीच्या वेळी प्रवास करत असताना जोरदार पावसात वळणाचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाला. वेल्हे तालुक्यातील १८ गाव मावळ भागातील मेटपिलावरे (ता. वेल्हे) येथील यशवंत बाबू बर्गे, अनिल आखाडे (रा. केळद, ता. वेल्हे) कारने (जी. जे. ६ जी. व्ही.६५११) वेल्ह्याकडे येत होते.रात्री ९.३० च्या दरम्यान भट्टीखिंडीजवळ असणाºया दरीत ही कार ५० ते ७० फूट खोल कोसळली. दरीत कोसळताना ही कार एका ठिकाणी दाट झुडपात घुसल्याने त्यात ही कार अडकून राहिली.अपघातात ही कार ५० ते ७० फूट दरीत कोसळली. मात्र काळ आला पण वेळ आली नव्हती. अपघातात कार उलटी होऊन कारचा चेमटा झाला. मात्र गाडीमधील यशवंत बर्गे आणि अनिल आखाडे यांना साधे खरचटलेही नाही.धोकादायक रस्त्यामुळे वारंवार दुर्घटनातालुक्याच्या पश्चिमेकडील शिवकालीन १८ गाव मावळ भागात जाण्यासाठी दाट डोंगररांगेतून एकमेव रस्ता आहे.अतिशय एकेरी ओबडधोबड रस्ता, वेडीवाकडे वळणे, दाट जंगल आणि घाटरस्त्यामुळे हा रस्ता जीवघेणा ठरत आहे. मागील महिन्यात याच घाटात कार कोसळून एक जण मयत झाला तर दोन गंभीर जखमी झाले होते.हा रस्ता धोकादायक असल्याने अपघाताची शक्यता असल्याचे आणि संरक्षक कठडे बसवण्याविषयी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते.
केवळ दैव बलवत्तर होते म्हणून बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 2:53 AM