शिरूर : ‘महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेला लुटणाऱ्या ठाकरे सरकारपासून मुक्त करणे हे आपले एकच लक्ष्य आहे,’ असे प्रतिपादन भाजपचे माजी केंद्रीय मंत्री किरीट सोमय्या यांनी केले.
पारनेर येथील साखर कारखान्याला भेट दिली. त्यानंतर त्यांनी शिरूर येथे माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. या वेळी माजी मंत्री बाळा भेगडे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस ॲड. धर्मेंद्र खांडरे, तालुकाध्यक्ष दादापाटील फराटे, शहराध्यक्ष, नगरसेवक नितीन पाचर्णे आदी उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना किरीट सोमय्या यांनी सांगितले की, आम्ही कोणत्याही निवडणुकांना सामोरे जायला तयार असून राज सरकारने बनवाबनवी थांबवावी. मराठा, ओबीसी आरक्षण व कोविडमध्ये ठाकरे सरकारने जनतेचा विश्वासघात केला असून, हे महाआघाडी सरकार फक्त पैसे गोळा करणे व भ्रष्टाचारासाठी आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीचे राज्य सरकारला खुले आवाहन असून, ज्या पद्धतीने करायचे त्या पद्धतीने ओबीसी व मराठा आरक्षण द्या. तसेच राज्य सरकारने गेल्या २१ महिन्यांत मोठ्या प्रमाणात घोटाळे केले असून कोविड काळात ठाकरे सरकारने मोठा घोटाळा केल्यामुळे सर्वात जास्त मृत्यू राज्यात झाल्याचा आरोप केला.